कोणत्याही शिक्षक/शिक्षिकांना शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनीना आणि आई-वडिलांना त्यांच्याच मुला-मुलीला मारावेसे का वाटते? लहान मुलांनी मोठ्यांचे ऐकले नाही म्हणून? चुका केल्या म्हणून? शिस्त नाही म्हणून? मुले-मुली लहान आहेत म्हणून की आपण वयाने तथाकथित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहोत म्हणून? आपल्याला हात- पाय आहेत, हातात पट्टीसारखे शस्त्र आहे म्हणून? सबल किंवा निव्वळ वयाने मोठे असलेल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर त्याचा वापर करावा? मुझफ्फरनगरमध्ये एका शिक्षिकेने एका विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांकरवी मारहाण करण्यास उद्युक्त केले आणि ‘शिक्षा’ केली. यावर अनेक प्रतिक्रिया आल्या परंतु शाळेमध्ये कोणत्याही विद्यार्थी-विद्यार्थिनीला मारण्याचा/मारहाण करण्याचे आदेश देण्याचा अधिकार शिक्षिकेस कोणी दिला, याबद्दल फार वाच्यता होताना दिसत नाही.
अनेक छोट्या गावात खेडेगावातील शाळांमधील शिक्षक-शिक्षिकांच्या हातात पट्टी-काठी ही अस्त्रs दिसतात आणि त्याचा वापर खुलेआम होताना दिसतोच शिवाय मुंबई-पुणे-सोलापूर-कोल्हापूर-जळगाव इथल्या अनेक शाळांमध्ये शिक्षक अभिमानाने काठी/फुटपट्टी हातात घेऊन शाळेत फिरताना दिसतात. त्याबद्दल कोणाही पालकांना तक्रार करावीशी वाटत नाहीच शिवाय शिक्षक वर्गालाही आपण काही अनुचित करत आहोत असे वाटत नाही. पट्टी-काठीचा धाक दाखवणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांनी अज्ञानाचा बुरखा पांघरला आहे की ते निर्ढावलेले आहेत?
I and the public know
What all schoolchildren learn,
Those to whom evil is done
Do evil in return.
म्हणजेच शालेय विद्यार्थ्यांबरोबर कोणीही गैरवर्तणूक केल्यास ती मुले मोठी झाल्यावर त्याचेच अनुकरण करणार. वडील आईला मारहाण करत आहेत, तिचा वारंवार अपमान करत आहेत, तिच्या अंगावर धावून जात आहेत, तिला वाट्टेल तसे बोलत आहेत असे दृश्य लहानपणी घरात नियमितपणे बघणारी मुले मोठे झाल्यावर समस्त स्त्रियांचा आदर करतील काय? शाळेमध्ये शिक्षकांकडून मार खाल्लेल्या मुला-मुलींना शाळेविषयी-शिक्षणाविषयी-शिक्षकांविषयी आदर वाटेल की द्वेष? शाळेमध्ये माराच्या धाकाने मुले गृहपाठ करतील की दुसऱ्याने केलेला गृहपाठ भीतीपोटी उतरवून काढतील? शाळांमध्ये आणि घराघरामध्ये होणाऱ्या या हिंसाचाराचे समर्थन कसे होऊ शकते? ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ ही भारतीय परंपरा आहे, संस्कृती आहे. परंतु हा दावा तकलादू आहे. मारहाण केल्याने, छडीच्या धाकाने शिक्षण दिले-घेतले जाऊ शकत नाही. अनेक शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा नावडता विषय विचारल्यास त्यांचे मत त्या विषयाच्या क्लिष्टपणावरून न ठरता शिक्षक-शिक्षिकांच्या वागणुकीवरून ठरते. तरीही शिक्षकवर्ग हिंसाचार का करतात? मुलां-मुलींनी चूक केली या कारणासाठी?
लहान मुले चुका करणारच. चुका करता करता कोणीही शिकत असतो/शिकले आहेत. शाळा हे घोकंपट्टी करून अपेक्षित उत्तर देण्याचे ठिकाण नाही. अनेक चुका केल्यानंतरच विज्ञान शिकता येते. घरातला स्वयंपाक असो वा ऑफिसमधले कोणतेही काम करताना चुका करता करता मोठी माणसे शिकतात. शिक्षक शिकवताना चुका करत नाहीत असे मुळीच नाही.
आई-वडील मुला-मुलीना वाढवताना असंख्य चुका करतात, वयाने मोठ्या असलेल्या पालक-शिक्षकांच्या चुकीला मारहाण करण्याची शिक्षा नसते. अनेक मोठी माणसे पुन:पुन्हा त्याच चुका वारंवार करताना दिसतात. कायद्यामध्ये बदल करून वय वाढलेल्या व्यक्तींना मारण्याची शिक्षा देण्याचे अधिकार सरकारी यंत्रणेला दिले तर योग्य होईल का?
वर्गात लक्ष नसणे, गृहपाठ न करणे, पालक-शिक्षकांनी सांगितलेले काम न करणे, प्रश्न विचारणे ही मारण्याची सर्वसाधारण कारणे आहेत. शाळेमध्ये प्रश्न विचारण्याला दुरुत्तरे करणे समजले जाते त्यामुळे सहसा शालेय शिक्षकांच्या तासाला निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी गप्प बसणे पसंत करतात. मारहाण होण्याच्या भीतीयुक्त वातावरणामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी नव्या युक्त्या सुचणे बंद होते. एकूणच शिक्षकांचा धाक वाटत असल्यामुळे शालेय शिक्षण अपेक्षित प्रश्न आणि अपेक्षित उत्तरामध्ये गुरफटले आहे आणि शिक्षक सांगतील तेच बरोबर असे होयबा निर्माण होत आहेत. शिक्षक सांगतील ती कामे करणारे ठराविक पाच विद्यार्थी प्रत्येक वर्गामध्ये असतात. त्यांनाच वर्गाचे सेक्रेटरी केले जाते, इतर मुलांवर लक्ष ठेवण्याची कामगिरी यांच्यावरच सोपवली जाते. त्यामुळे शाळेतील सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन करण्यात अनेक विद्यार्थी पारंगत होतात.
हिंसाचाराचे अनेक प्रकार आहेत. शारीरिक हिंसाचाराबरोबरच शिक्षकांचे शेलकी शेरे मुलांच्या मनावर आघात करतात. एका शालेय विद्यार्थ्याने शिक्षकांना एक प्रश्न विचारला, त्याचे उत्तर शिक्षकांना त्यावेळी देता आले नाही. त्यामुळे शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला त्या दिवसापासून “ओ हुशार विद्यार्थी, तुम्हाला याचं उत्तर माहित आहे का?” असा जाहीर उपमर्द करण्यास सुरुवात केली. पुढील चार वर्षे शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या विद्यार्थ्याला ते वाक्य ऐकून घ्यावे लागले. “हुशार विद्यार्थी” ही त्याच्या दृष्टीने शिवी ठरली आणि इतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपहास/चेष्टा करण्याचे एक कारण! एका इंग्रजीच्या शिक्षकांनी पाचवीच्या मुलांना ए-बी-सी-डी ही इंग्रजी मुळाक्षरे प्रत्येकी पंचवीसवेळा लिहून आणायला सांगितली. मुळात असला कोणताही विचार नसलेला ‘गधा-मेहनत’ छाप गृहपाठ करण्याचा मुलांना कंटाळा येणे नैसर्गिक आहे. त्यामुळे एका विद्यार्थ्याचे पालक शाळेत शिक्षकांशी संवाद साधायला गेले आणि त्यांनी इंग्रजीच्या शिक्षकांना सूचना केली की असा गृहपाठ देण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक अक्षरापासून सुरु होणारे पंचवीस शब्द लिहा, असा गृहपाठ दिला तर मुले डोके चालवण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे इंग्रजी शिकण्याचा उद्देश सफल होईल. यावर शिक्षकांनी प्रत्येकवेळी गृहपाठ देताना सांगण्यास सुरुवात केली, “मुलांनो आजचा गृहपाठ, एक वाक्य पंधरावेळा लिहून आणा, पण हा दिवटा सोडून कारण त्याला जास्त अक्कल आहे.” सगळीच मुले हसू लागली. त्यामुळे शिक्षकांनी हे वाक्य वर्षभर नियमितपणे उच्चारून त्या विद्यार्थ्याचे खच्चीकरण केले. वर्गात कोणत्याही विद्यार्थ्याचा असा जाहीर पाणउतारा करणे हा शाब्दिक हिंसाचार आहे, ज्याचे मुलांच्या मानसिकतेवर दूरगामी परिणाम होतात.
हट्टी म्हणजेच कोणाचेही न ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा अभिनव पद्धतीने देता येतात. वर्गामध्ये भिंतीकडे तोंड करून बसण्यास सांगता येईल, भूमिती/विज्ञानाच्या पुस्तकातील सर्व चित्रे काढून आणण्याचा गृहपाठ देता येईल. पूर्ण वर्गाला एखादा धडा शिकवण्याची शिक्षा देता येईल. काही विद्यार्थी नियमितपणे गृहपाठ करत नसल्यास त्या मुलांच्या घरी जाऊन त्याची कारणे तपासावी लागतील. अभ्यास न आवडणे या व्यतिरिक्त घर छोटे असणे, मुलां-मुलींना घरातील सर्व कामे करावी लागणे अशी अनेक कारणे असू शकतात. शिक्षेच्या धाकाने किती विद्यार्थी-पाल्य सुधारतात याचा अभ्यास शिक्षक-पालकांनी करणे गरजेचे आहे.
कोणाचेही कौतुक जाहीररीत्या करावे आणि चुका दर्शनाचा कार्यक्रम सर्वांसमोर करू नये, हा सर्वसाधारण नियम शालेय शिक्षणात पाळला जात नाही, हीच तर खरी खंत आहे. शाळेच्या संचालक वर्गाने पुढाकार घेऊन दरमहा शिक्षकांची बैठक बोलावून त्यामध्ये शाळेच्या आवारामध्ये झालेल्या हिंसाचाराची चर्चा करावी आणि तो रोखण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा करावी. विद्यार्थ्यांना कोणाही विरुद्ध तक्रार करण्याची संधी मिळावी यासाठी शाळेच्या आवारात एक पत्र पेटी असावी ज्यामध्ये निनावी पत्रे विद्यार्थी लिहू शकतात अशी व्यवस्था करता येईल. मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये कोणत्याही विद्यार्थी-विद्यार्थिनीला विना-परवानगी प्रवेश असावा आणि त्यांना मुख्याध्यापकांशी संवाद साधता यावा असे खुले वातावरण असावे. द्रविड हायस्कूल, वाई (जिल्हा सातारा) येथे नागेश मोने मुख्याध्यापक असताना त्यांनी अशी व्यवस्था केली होती. उमलत्या वयामध्ये म्हणजेच आताच्या काळानुसार सातवी ते दहावीच्या विद्यार्थी-
विद्यार्थिनीबरोबर वागताना पालक-शिक्षकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शिक्षकांचे न ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना मागच्या बाकावर बसवण्यापेक्षा पुढच्या बाकावर बसवणे आवश्यक आहे. काही शाळांनी बसण्याची व्यवस्था दररोज/प्रत्येक आठवड्याला बदलण्याचे उत्तम नियोजन केले आहे. काही विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये पारंगत नसतील तर त्यांना जाहीरपणे अप्रगत विद्यार्थी म्हटले जाते, जे टाळण्याची व्यवस्था शाळेच्या संचालकांनी करण्याची गरज आहे. प्रत्येक शाळेच्या संचालक मंडळावर एक सक्रीय मानसोपचार तज्ञ/मानसशास्त्र सल्लागार असणे आवश्यक आहे, ज्याचा सल्ला शिक्षकांनी नियमितपणे घ्यावा आणि रागावर नियंत्रण करण्याचे तंत्र शिकून घ्यावे, ही आजच्या काळाची गरज आहे.
सुहास किर्लोस्कर








