बिहारमधील विचित्र घटना : विद्यार्थ्याचे एक वर्ष गेले वाया
► वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या जमुई जिल्ह्यातील एका शाळेने विद्यार्थ्याच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटनमध्ये 30 फेब्रुवारी अशी जन्मतारीख नोंद केली आहे. शाळेच्या अधिकाऱ्यांनी अलिकडेच विद्यार्थ्याला स्थानांतरण प्रमाणपत्र (टीसी) जारी केल होते. या विद्याथ्याने संबंधित शाळेतून इयत्ता आठवीत उत्तीर्ण होत दुसऱ्या शाळेत इयत्ता नववीमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला होता.
शाळेकडून विद्यार्थी अमन कुमार याच्या टीसीवर ‘30 फेब्रुवारी 2009’ अशी जन्मतारीख नोंदविण्यात आली होती. अमन कुमार आणि त्याच्या कुटुंबाला शाळेच्या या प्रतापामुळे मोठा त्रास सहन करावा लागला आहे. जमुई जिल्ह्यातील उत्क्रमित माध्यमिक विद्यालयाकडून झालेल्या या चुकीमुळे अमन कुमारला यंदा इयत्ता नववीमध्ये प्रवेश मिळविता आलेला नाही.
स्वत:च्या मुलाला प्रवेश मिळवून देण्यासाठी एका स्थानिक शाळेत गेल्यावर तेथील मुख्याध्यापकांनी टीसीवर जन्मतारीख 30 फेब्रुवारी असल्याचे प्रवेश नाकारला होता. टीसीवरील चूक दुरुस्त करण्याची सूचना त्यांनी केली होती. तेव्हापासून मी चकाई येथील शाळेचे उंबरठे झिजवत आहे, परंतु कुठलाच फायदा झाला नसल्याचे अमन कुमारच्या वडिलांनी सांगितले आहे.
जिल्हाशिक्षण अधिकारी कपिल देव तिवारी यांनी कारवाईचे आश्वासन देत याप्रकरणी दखल घेतल्याचे सांगितले आहे. टीसी जारी करणाऱ्या चकाई विद्यालयाच्या मुख्याध्यापकांकडून त्यांनी स्पष्टीकरण मागविले आहे. प्रभारी मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसवर उत्तर मिळाल्यावर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.
ग्रेगोरियन कॅलेंडरचा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारीमध्ये सर्वसाधारणपणे 28 दिवस असतात तर लीप ईयरमध्ये 29 दिवसांचा महिना असतो. मागील लीप ईयर 2020 मध्ये होते आणि पुढील लीप ईयर 2024 मध्ये असणार आहे.









