शाळा चालविण्यास सरकार सक्षम : विरोधकांनी चिंता करू नये : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा टोला
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे विलिनीकरण करण्याचा सरकारचा प्रस्ताव सध्यातरी नियोजन स्थितीतच आहे. त्यामुळे विरोधकांनी चिंता करू नये. तसेच या विषयावर त्यांच्या सल्ल्याची सरकारला गरज नाही, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे.
शाळांच्या विलिनीकरणावरून आम आदमी पक्षाने सरकारवर टीका करून सरकार शाळा चालविण्यास असमर्थ असेल तर त्या आपच्या ताब्यात द्याव्या, दिल्ली मॉडेलच्या धर्तीवर आम्ही त्या चालवून दाखवू, असे जाहीर आव्हान सरकारला दिले होते. त्यासंबंधी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले.
शाळांच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव सध्या नियोजनाच्या टप्प्यावर असून पालक तसेच शिक्षकांशी सल्लामसलत केल्यानंतरच त्यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात येईल. आपणाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या सल्ल्याची गरज नाही. सरकार शाळा चालवण्यास आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यास सक्षम आहे, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबरोबर शिक्षकांचीही संख्या वाढणार
अनेक प्राथमिक शाळांमध्ये केवळ चार ते पाच विद्यार्थी असतात तसेच वर्गात एकच शिक्षक असतो. याचा शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. विलीनीकरण झाल्यास विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढू शकते तसेच शिक्षकांची संख्या देखील वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विलिनीकरणासंबंधी शिक्षक, पालकांशी चर्चा सुरू असल्याने राजकीय विरोधकांनी पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.









