वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक येथील सरकारी कन्नड प्राथमिक शाळेतील 7 वी व सरकारी कन्नड हायस्कूलमधील 10 वीच्या विद्यार्थ्यांना हिंडाल्को कंपनीच्यावतीने शालोपयोगी साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाला हिंडाल्कोचे वरिष्ठ अधिकारी मयूर कृष्णा व महेश शेट्टी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक व कंपास बॉक्सचे वितरण करण्यात आले. प्रारंभी मयूर कृष्णा व महेश शेट्टी यांचे शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मयूर कृष्णा यांनी, विद्यार्थ्यांनी आई-वडील व शिक्षकांची आज्ञा पालन करावी, असा संदेश दिला. महेश शेट्टी यांनी विद्यार्थ्यांनी शाळेचे व गावचे नाव उज्ज्वल करावे, असे सांगितले. कार्यक्रमाला ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, शाळा सुधारणा कमिटी सदस्य सद्याप्पा राजकट्टी, प्रभा शिगीहळ्ळी, कल्लाप्पा कांबळे, हलिमा साबखान, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. वंदना एन. के. यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









