जुने बेळगाव शाळेतील प्रकार : एसडीएमसी कमिटीकडून संताप
बेळगाव : शाळेतील शिक्षिकेबाबत वाढत्या तक्रारींमुळे मंगळवारी जुने बेळगाव येथील ग्रामस्थांनी शाळेला कुलूप घातले. शिक्षिकेकडून आरोग्य तसेच इतर कारणे देत जबाबदारी झटकली जात असून चांगल्या दर्जाचे अध्यापन होत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. गटशिक्षणाधिकारी व जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील संबंधित शिक्षिकेची बदली न झाल्याने शाळेला कुलूप घालण्यात आले. जुने बेळगाव येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा क्र. 33 मध्ये सध्या एकूण 82 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 5 शिक्षक शाळेमध्ये कार्यरत आहेत. सरकारी शाळांमधील पटसंख्या घसरत असताना एसडीएमसी कमिटीच्या प्रयत्नाने पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु शाळेतील एक ज्येष्ठ शिक्षिका कोणतेच सहकार्य करत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मुख्याध्यापक निवृत्त झाल्यामुळे त्या जागी प्रभारी म्हणून त्यांची नेमणूक होणार होती. परंतु आरोग्याचे कारण देत त्यांनी ती जबाबदारी झटकली.
तसेच वरच्या वर्गांना शिकविण्यासाठीही तयार होत नसल्याचे पालकांनी सांगितले. डिसेंबर 2024 मध्ये गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री व जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांना एसडीएमसी कमिटीने तक्रार केली होती. त्यानंतर कोणतीच कारवाई न केल्याने दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले. यानंतर डीआरसी व सीआरपी हे शाळा भेटीवर आले. परंतु त्यांनीही पुढे काहीच केले नाही. त्यामुळे मंगळवारी एसडीएमसी कमिटी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाळेला कुलूप घालण्यात आले. याची दखल घेत सीआरपी व बीआरसी यांनी एसडीएमसी कमिटीची भेट घेतली. मंगळवारी सायंकाळपर्यंत याबाबतचा निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी एसडीएमसी अध्यक्ष विनायक पाटील, उपाध्यक्षा संध्या जाधव, सदस्य सुनीता पाटील, सविता खन्नूकर, विनायक कर्लेकर, प्रभाकर बेनके, नितीन पाटील, संतोष शिवणगेकर, मोहन बेनके, संदीप पाटील, योगेश धामणेकर यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाला मिळाले यश
एसडीएमसी कमिटी व ग्रामस्थांच्या आंदोलनाला मंगळवारी सायंकाळी यश आले. गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून संबंधित शिक्षिकेच्या बदलीचे आदेश बजावण्यात आले. त्या शिक्षिकेची अनगोळ येथील एका शाळेत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी बदली केली आहे. त्यामुळे पालकांच्या आंदोलनाला यश आले.
कार्यवाही न झाल्यास शाळेला कुलूप
शाळेतील एका शिक्षिकेबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या शिक्षिकेची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी करूनदेखील दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर शाळेला कुलूप ठोकण्यात आले. मंगळवारी सायंकाळपर्यंत शिक्षण विभागाला वेळ देण्यात आला असून त्यापूर्वी बदली न झाल्यास शाळेला बुधवारी पुन्हा कुलूप घालण्यात येईल.
-विनायक पाटील- एसडीएमसी अध्यक्ष









