प्रतिनिधी / बेळगाव
दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चौथ्या रेल्वेगेटजवळ घडली आहे. चाचणी परीक्षेत नापास झाल्याने या तरुणीने आपले जीवन संपविले आहे.
प्रीती अरुण कांबळे (वय 16) मूळची राहणार कंग्राळी बी. के. सध्या रा. संत रोहिदासनगर असे त्या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे. शिक्षणासाठी आई व लहान भावासोबत प्रीती संत रोहिदासनगरमध्ये रहात होती. आई कामाला गेली होती. शाळेला जाण्याचे सांगून गुरुवारी सकाळी ती घरातून बाहेर पडली. मजगाव येथे आपण शिकत असलेल्या शाळेला जाऊन ती घरी परतली नव्हती.
गुरुवारी सायंकाळी हरिप्रिया एक्स्प्रेसखाली झोकून देऊन तिने आपले जीवन संपविले आहे. चालकाने तिला पाहून ब्रेक लावला. मात्र, रेल्वेचा वेग अधिक असल्याने वेळीच गाडी थांबली नाही. रेल्वेचा निसटता धक्का बसून ती उडून पडली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
सायंकाळी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर रेल्वे पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत.









