रत्नागिरी :
गेल्या सव्वा महिन्याच्या सुट्टीतील मौजमजेनंतर 2025-26 या नव्या शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने जिल्ह्यातील सर्व विद्यामंदिरे पुन्हा गजबजून गेली आहेत. आकर्षक सजावट, ढोल-ताशांचा गजर, कुठे चारचाकी तर कुठे बैलगाडीतून आणि पावसाच्या सरींमध्ये जिल्ह्यात 10 हजार 121 नवागतांचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.
नवागतांच्या स्वागतासाठी सर्व शाळांची स्वच्छता, साफसफाईची कामे अगोदरच उरकून घेण्यात आलेली होती. मुलांच्या स्वागतासाठी शाळांच्या दरवाजाची आकर्षक फुले, फुग्यांनी सजावट करून नवागतांचे व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांचेही गुलाबपुष्प, वृक्षरोप देऊन स्वागत करण्यात आले.

शहरातील शाळांमध्ये त्यांच्या मुख्य गेटवर विद्यार्थी येताच स्वागत केले जात होते. पण ग्रामीण भागात हे चित्र काहीसे वेगळे होते. तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या. स्वागत दिंडीत मुलांबरोबर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते.
पहिल्या दिवशी नवे दप्तर, नवी पुस्तके, साहित्य अशा वातावरणात विद्यार्थ्याचा अनोखा साज होता. त्यावेळी अनेक मुलांचे पालकही शाळांमध्ये आलेले होते. शाळा प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्dयात पहिली ते आठवीत शिकणाऱ्या 1 लाख 279 लाभार्थी विद्यार्थ्यांना 6 लाख 12,166 पाठ्यापुस्तकांचे वितरण पहिल्या दिवशी करण्यात आले. तसेच मेफत गणवेश, बूट व दोन जोड पायमोजे 66,289 लाभार्थी विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत गोड पदार्थाचेही वाटप करण्यात आले.








