गोकुळ शिरगाव / प्रतिनिधी
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज कणेरीवाडी येथील शाळांना अचानक भेट दिली. विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांचाही विचार करूनच शैक्षणिक धोरण ठरवले जाते. त्यामुळेच आज कणेरीवाडी तालुका करवीर येथील श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या सानिध्यातील शाळेंना भेट देण्याचा योग आला असे ते म्हणाले. सुरुवातीला त्यांनी माजी शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी ज्या डिजिटल शाळेचे मागील वर्षी उद्घाघाटन केले होते त्या विद्यामंदिर कणेरीवाडी शाळेला त्यांनी प्रथम भेट दिली. त्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थ विद्यालय कणेरीवाडी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची भेट घेतली. यावेळी मंत्री केसरकर यांनी वैयक्तिक वर्गात जाऊन मुलांची वही तपासून शाळेचा अभ्यासक्रम व घरचा अभ्यासक्रम याची माहिती वर्गातच मुलांकडून घेतली.
त्यानंतर त्यांनी स्वामी समर्थ विद्यालयातील सर्व शिक्षकांशी बंद खोलीत शैक्षणिक धोरणासंदर्भात सकारात्मक चर्चा केली. यावेळी या शाळेतील शिक्षकांना शिक्षण मंत्र्यांच्या बरोबर वैयक्तिक विषय मांडण्याचा योग आल्याने शिक्षक आनंदात होते. शिक्षण मंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नाला आम्ही सकारात्मक उत्तरे दिली असून आमच्या प्रश्नांनाही शिक्षण मंत्र्यांकडून पूर्ण अपेक्षित अशी उत्तरे मिळाल्याने शिक्षकही समाधानी होते. शिवाय १०० टक्के अनुदान मिळेल अशी अशा सुद्धा यावेळी या शिक्षकांनी व्यक्त केली.
सुरुवातीला शाळेच्या पटांगणात शिक्षण मंत्र्यांचे शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा भुसारी, शिक्षक प्रशांत वाळवेकर, संतोष वाळवेकर, निंबाजी खोकले, रामचंद्र कदम, संजय हराळे तर कनेरवाडी चे माजी सरपंच पांडुरंग खोत, सुभाष भोसले , प्रदीप केसरकर आदी यावेळी उपस्थित होते.









