फुगे, गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत : बैलगाडीतून आगमन : विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित : प्रभात फेरींचे आकर्षण
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या विविध गावातील सरकारी शाळांमध्ये शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात शाळा प्रारंभोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. उन्हाळी सुटीनंतर शुक्रवारी गावा-गावांतील शाळांमधील घंटा वाजल्या. विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. विद्यार्थ्यांना फुगे, खाऊचे पदार्थ देण्यात आले. दि. 29 रोजीपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. 29 रोजी शाळांमध्ये शिक्षक आले होते. मात्र प्रशासनाच्या आदेशानुसार दि. 30 रोजी गावागावातील शाळांमध्ये प्रारंभोत्सव शाळा करण्यात आला. या प्रारंभोत्सवानिमित्त शाळांना आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. बहुतांशी शाळांमध्ये आंब्याच्या झाडाच्या पानांची आंबोती बांधण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना शाळेचे आकर्षण वाटावे यासाठी विद्यार्थ्यांच्या हातात फुगे, तसेच गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत होते.
सावगाव-बेळगुंदी
सावगाव गावातील प्राथमिक मराठी शाळेत शुक्रवारी शाळा प्रारंभोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी कमिटीचे अध्यक्ष सागर सावगावकर हे होते. ग्रा.पं. अध्यक्ष डॉ. यल्लाप्पा पाटील, कलाप्पा पाटील, गणपत पाटील, लक्ष्मी सुतार आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना फुगे, टोप्या देऊन स्वागत करण्यात आले. बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतनमध्ये शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. शंकर चौगुले, पि. के. हदगल, डी. डी. बेळगावकर आदींची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा शहापूरकर यांनी केले. गोविंद गावडे यांनी आभार मानले.
कर्ले येथील प्राथमिक मराठी शाळा
कर्ले येथील प्राथमिक मराठी शाळेच्या वतीने गावात बैलगाडीतून विद्यार्थ्यांना आणण्यात आले व अनोखा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी गावात प्रभातफेरी काढण्यात आली. या फेरीच्या माध्यमातून सरकारी शाळेंबद्दल जनजागृती करण्यात आली. त्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सजवलेल्या बैलगाडीतून आणण्यात आले. बैलगाडीत बसताना लहान विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. कमिटीचे अध्यक्ष नरसिंग देसाई, सदस्य नवनाथ खामकर आदींसह मान्यवर मंडळी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापिका पूजा पाटील यांनी केले.
बहाद्दरवाडी शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
बहाद्दरवाडी येथील प्राथमिक मराठी शाळेत शाळा प्रारंभोत्सवनिमित्त इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन ग्रामपंचायत सदस्य मल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नावगे, किणये, रणकुंडये, बिजगर्णी, बेळगुंदी, बेळवट्टी, सोनोली, यळेबैल, राकसकोप, इनाम बडस, बाकनुर, झाडशहापूर, वाघवडे, बामणवाडी, बाळगमट्टी, देसूर नंदीहळळी, राजहंसगड, जानेवाडी आदी गावातील शाळांमध्ये विविध उपक्रम या शाळा प्रारंभोत्सवानिमित राबविण्यात आले.









