….तोपर्यंत शाळा बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा कुणकेरीवासियांचा इशारा !
ओटवणे प्रतिनिधी
कुणकेरी शाळा नं १ मध्ये सात वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत असुन दोन पदवीधर शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शिक्षण विभागाचे अनेकवेळा लक्ष वेधुनही दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थानी गुरूवारी सकाळपासुन शाळा बंद आंदोलन छेडले. दरम्यान जोपर्यंत शाळेला दोन पदवीधर शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कुणकेरी ग्रामस्थानी दिला आहे.
या शाळेत पाच शिक्षक कार्यरत होते. मात्र तीन शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने एक महिन्यापूर्वी आंबेगाव शाळेतील रसिका नाईक यांना पदवीधर शिक्षिका म्हणून पाठविण्यात आले होते. मात्र आठ दिवसांपूर्वी आंबेगाव ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन छेडल्यानंतर पुन्हा त्यांची आंबेगाव शाळेत नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे सध्या या शाळेतील दोन्ही पदवीधर शिक्षक पदे रिक्त असून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
याबाबत शिक्षण विभागाचे कुणकेरी ग्रामस्थांनी अनेक वेळा लक्ष वेधले मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच
गुरुवारी सकाळी पालकांनी विद्यार्थ्यांना आपल्यासोबत आणून शाळेच्या व्हरांड्यात बसविली आणि शाळा बंद आंदोलनात सुरुवात केली. यावेळी उपस्थित शिक्षकांना शाळा उघडण्यास ग्रामस्थांनी अटकाव केला. यावेळी संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शिक्षकाअभावी मुलांना सामोरे जाव्या लागणाऱ्या शैक्षणिक नुकसानीचा पाढाच वाचला.
या शाळा बंद आंदोलनात सरपंच सोनिया सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजन मडवळ, उपाध्यक्ष योगेश परब, शिक्षण तज्ञ सूर्यकांत सावंत, कुणकेरी कला क्रीडा विकास मंडळाचे अध्यक्ष भरत सावंत, माजी सरपंच विश्राम सावंत, मंगेश सावंत, जितेंद्र कुणकेरकर, नारायण मोरये, राजन गावडे, कृष्णा मेस्त्री, अनिल परब आनंद मेस्त्री आदी पालक व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.









