रविवारी सुटी असल्याने धोका टळला
खानापूर : खानापूर तालुक्यातील अवरोळी येथील सरकारी प्राथमिक शाळेची इमारत रविवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे कोसळली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. रविवार दि. 8 रोजी सायंकाळी 7 वाजता अवरोळी परिसरात वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडल्याने अवरोळी येथील शाळेची इमारत अचानक कोसळली. एसडीएमसी सदस्यांनी रविवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून शाळेची इमारत पावसामुळे कोसळल्याची माहिती दिली. ग्राम पंचायत सदस्य शेखाप्पा कोडोली, भाजपचे युवा नेते जोतिबा भरमपण्णावर, एसडीएमसी अध्यक्ष रुद्रप्पा चवलगी, ग्रा. पं. अध्यक्ष अशोक कोडोली, विठ्ठल देशनूर, शिवानंद कोडोली व नागरिकांनी पाहणी केली आहे. शाळा इमारत तातडीने नव्याने बांधून देण्याची मागणी करण्यात आली आहे.









