बांधकाम कामगारांना मोठा दिलासा : राज्य सरकारकडून 225 कोटी रुपये मंजूर
बेळगाव : गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती देण्यात आली नव्हती. त्यामुळे बांधकाम संघटना व इतर संघटनांच्यावतीने कामगार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले होते. याचबरोबर सरकारकडे पाठपुरावाही केला होता. त्याला यश आले असून राज्य सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांना 225 कोटी मंजूर केले असून लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. लातूर यांनी दिली आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात आली नव्हती. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. राज्यातील 9 लाख 61 हजार मुलांना शिष्यवृत्ती देणे बाकी होते. त्यांना आता सरकारने शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील एकूण 70 हजार मुलांना याचा लाभ होणार आहे. बेळगाव शहर व तालुक्यातील 30 हजार मुलांचा यामध्ये समावेश असून येत्या आठ दिवसांत त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. कामगारांनी आता कोठेही हेलपाटे न मारता आठ दिवसानंतर बँकेत जाऊन रक्कम जमा झाली की नाही, याची खातरजमा करावी, असे आवाहन अॅड. एन. आर. लातूर यांनी केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि कामगार मंत्री संतोष लाड यांच्या हस्ते हा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता कामगारांच्या मुलांना दिलासा मिळाला आहे.
इतर मागण्यांसाठी 24 रोजी आंदोलन
कामगारांचे लग्न किंवा त्याच्या मुलांच्या लग्नासाठी निधी दिला जातो. तो निधी देण्यास विलंब करण्यात येत आहे. याचबरोबर वैद्यकीय उपचाराला खर्च केलेला निधीही देण्यास टाळाटाळ सुरू आहे. याचबरोबर काही बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली गेली नाही. त्या सर्व समस्यांसाठी शुक्रवार दि. 24 रोजी कामगार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तरी त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









