कसबा बीड :
आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते पाचवी व आठवी शिष्यवृत्ती सराव परीक्षाचे उद्घाटन झाले. स्वर्गीय प्रकाशराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कन्या व कुमार विद्यामंदिर, कोगे या शाळेत आज कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभी -कासारी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वासराव पाटील होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, शिक्षणाचा पाया चांगला असेल तरच विद्यार्थ्यांची जडणघडण होते. कन्या व कुमार विद्या मंदिर या शाळेत विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा मिळत असल्याने त्यांच्या गुणवत्ता वाढीस मदत होत आहे. स्वर्गीय प्रकाशराव पाटील हयातीत असताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्यांनी शाळेच्या माध्यमातून एक संस्कार केंद्र उभारण्याचे काम केले ते खरोखरच वाखण्याजोगे आहे. आज शिक्षणात स्पर्धा झपाट्याने वाढत आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना टिकायचे असेल तर आपले ध्येय निश्चित करून तशी वाटचाल केली पाहिजे. बहुजन समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळायचे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असेही आमदार जयंत आसगावकर म्हणाले.
यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी विजय ओतारी, कोगे गावच्या सरपंच वंदना इंगवले, उपसरपंच कृष्णात फडतारे, रमेश बिगवेकर, तानाजी पाटील, सुहास पाटील, संगीता यादव, शिवाजी बागडी, प्रकाश म्हेतर आदी मान्यवर उपस्थित होते.








