पी.जी.कांबळे/आवळी बुद्रुक
जिह्यातील बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज दाखल करून नऊ ते दहा महिने झाले, तरी अजून शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर आलेली नाही. या संबंधित विभागाने कोणत्या कारणांनी शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली नाही? याची संभ्रमावस्था निर्माण झाल्याने अजून किती दिवस याची प्रतीक्षा करावी लागणार अशी विचारणा बांधकाम कामगार व पाल्यातून होत आहे.
महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या आहेत. नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी इयत्ता पहिली ते पदवी तसेच पदवीनंतरच्या शिक्षणासाठी अडीच हजार ते 1 लाख पर्यंतची शिष्यवृत्ती योजना राबविली आहे. मागील वर्षी कोल्हापूर जिह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी आपल्या पाल्यांच्या शिष्यवृत्तीची सुमारे लाखभर प्रकरणे ऑनलाइन नोंदवली आहेत. त्यापैकी कांहीच प्रकरणे निर्गत झाली आहेत. तर सुमारे हजारो शिष्यवृत्ती अर्ज पेडींग आहेत. दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाले तरी शिष्यवृत्ती मिळाल्या नाहीत. कामगार पालकांना याची प्रतीक्षा लागून राहिल्याने शिष्यवृत्ती मंजूरीसाठी संबंधितांकडे वारंवार विचारणा करण्यासाठी हेलपाटे मारत आहेत.
इयत्ता 1 ली ते 7 वीसाठी प्रत्येक वर्षाला मिळणार 2 हजार 500 रुपये, 8 वी ते 10 वीसाठी 5 हजार रुपये, दोन पाल्यांना इयत्ता 10वी किंवा 12 वीमध्ये 50 टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास रुपये 10 हजार रुपये, पाल्य किंवा कामगार यांची पत्नी शिक्षण घेत असेल तर अशावेळी त्यांना 20 हजार रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते. कामगाराचा पाल्य किंवा पत्नी वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत असेल तर त्यांना प्रतिवर्ष 1 लाख तर अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी 60 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ऑनलाईनद्वारे शिष्यवृत्ती लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. अशी ही कल्याणकारी योजना आहे.
मात्र कित्येक महिने ऑनलाईन अर्ज दाखल करून आणि कोणत्याही त्रुटी नसताना देखील अजून हे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत या संदर्भात लालबावटा संघटना व इतर बांधकाम संघटनांनी वारंवार निवेदने व तोंडी सूचना देखील केल्या आहेत मात्र यामध्ये कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. छोट्या व कमी रकमेच्या शिष्यवृत्ती मंजूर केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मोठ्या रकमेच्या शिष्यवृत्ती अद्याप मंजूर केल्या नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केल्या आहेत.
सांगली जिह्याचे काम झाल्यानंतर कोल्हापूर जिह्यातील बांधकाम कल्याणकारी कार्यालयाकडे बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्जांची निर्गत होवून शिष्यवृत्ती लाभार्थ्यांना दिली जाईल. ऑडिट, पडताळणी तसेच तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर शिष्यवृत्ती लवकरच खात्यावर वर्ग करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
विशाल घोडके सहाय्यक आयुक्त









