15 पासून कामाला सुरुवात : वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती
वार्ताहर /मडकई
दुर्भाट व वाडी तळावली पंचायत क्षेत्रात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून रु. 13 कोटींची ही योजना आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून या कामाला सुरुवात होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वीज प्रवाहात अमुलाग्र सुधारणा होणार असून खंडित विजेची समस्याही दूर होईल, अशी माहिती स्थानिक आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
कुंडई पंचायत क्षेत्रात अंदाजे रु. 3.50 कोटी खर्चून हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामाला येत्या महिन्यात सुरुवात होणार आहे. तसेच या पंचायत क्षेत्रातही भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे, असे त्यांनी सांगितले. दासोळवाडा कुंडई येथे जलसंवर्धन खात्यातर्फे उभारण्यात येणारी सरंक्षक भिंत व जिल्हा पंचायत निधीतून श्री बेताळ देवस्थानचे सुशोभीकरण या दोन्ही कामांचा शुभारंभ केल्यानंतर मंत्री ढवळीकर बोलत होते. यावेळी वेलिंग जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, सरपंच सर्वेश गावडे, उपसरपंच रुपेश कुंडईकर, पंचसदस्य विश्वास फडते, उज्ज्वला नाईक, मनिषा नाईक, दिपाली गावडे, माजी पंचसदस्य लक्ष्मण जोशी, समाजसेवक मिथून वैद्य, नवदुर्गा देवस्थानचे अध्यक्ष प्रसाद कामत व ग्रामस्थ उपस्थित होते.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या तौक्ते वादळामुळे कुंडई, बांदोडा, मडकई, आडपई, ढवळी आदी भागात वीज वाहिन्या व उपकरणांचे मोठय़ा प्रमाणात नुकसा झाले. किमान तीन दिवस वीज प्रवाह खंडित होता. भूमिगत वीज वाहिन्यांमुळे नैसर्गिक आपत्तीच्यावेळी वीज खंडित होण्याचे प्रकार आटोक्यात येतील. मडकई मतदार संघात येत्या सहा महिन्यात रु. 20 कोटी खर्चून विकासकामे राबविण्यात येतील, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.
मडकईत विकासाचे नवे पर्व
सन् 2022 ते 2024 पर्यंत मतदार संघात विकासाच्या नव्या पर्वाला सरुवात होईल. दुर्भाट आगापूर व वाडी तळावली पंचायतींना नवीन इमारती, मडकई मैदानवर क्रिकेट, फुटबॉल या खेळांसह टेबल टेनीस कोर्ट, व्यायाम शाळा, विश्रामकक्ष अशा अनेक सुविधांनी निर्माण केल्या जातील. स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर नवीन साज चढविला जाईल. मडकई मतदार संघातील रस्ते खराब झाल्याने लवकरच त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सर्वेश गावडे यांनी स्वागत तर प्रसाद कामत यांनी आभार व्यक्त केले.









