२८ नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरवात : १८ डिसेंबरला मतदान
कोल्हापूर/प्रतिनिधी
माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील 7751 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. यामध्ये जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता जाहीर झाली असून 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला मतमोजणी होईल. 28 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावकारभाऱयांच्या राजकीय जोडण्या सुरु झाल्या असून मतदारांच्या गाठीभेटींना वेग येणार आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी संबंधित तहसिलदारांकडून 18 नोव्हेंबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 5 डिसेंबरला सकाळी 11 पासून उमेदवारी अर्जांची छाननी सुरू होणार आहे. 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. यानंतर चिन्ह वाटप होणार आहे. 18 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत मतदान होणार आहे. 20 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
राजकीय जोडण्यांना वेग
निवडणुका जाहीर झाल्यामुळे गावांमध्ये राजकीय जोडण्यांना वेग आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे राजकीय वाटचालीमधील पहिली पायरी. ही पायरी यशस्वीरित्या सर करण्यासाठी अनेक इच्छूक सरसावले आहेत. सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होत असल्यामुळे प्रत्येक गावात चुरस वाढली आहे. गावात जेवढे पक्ष, तेवढे गट असतात. काही गावात एकाच पक्षाचे दोन ते तीन गट आहेत. परिणामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये नेमकी कोणत्या गटाच्या बाजूने भूमिका घ्यायची याबाबत नेतेही संभ्रमात असतात. त्यामुळेच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न असतात. त्या पार्श्वभूमीवर आगामी काळात आपल्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बोलावून त्यांचे मत आजमावले जाण्याची शक्यता आहे. एका गटाला सरपंच पद, दुसऱ्या गटाला उपसरपंचपद तिसरा गट असेल तर त्याला सेवा संस्था किंवा दूधसंस्थेचे अध्यक्ष पद अशी विभागणी करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांकडून हालचाली होण्याची शक्यता आहेत. पण प्रत्येकाला आपल्याच गटाचा सरपंच हवा असल्यामुळे सरपंच पदाच्या एक जागेसाठी अनेक गावांमध्ये निवडणूक लागण्याची शक्यता बळावली आहे.
नेत्यांचा प्रतिष्ठा पणाला
जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असल्यामुळे सुमारे 50 टक्के गावांचा समावेश आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसह विधानसभेची रंगीत तालीम ठरणार आहे. परिणामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून एक-एक गाव ताब्यात घेण्यासाठी त्या मतदार संघातील लोकप्रतिनिधींची ताकद पणाला लागणार आहे.
बिनविरोध निवडीसाठी लागणार कस
ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करावयाची झाल्यास कार्यक्षम, हुशार व गावासाठी योगदान देऊ देऊ शकणारा उमेदवार निवडणे आवश्यक आहे. सरपंच पद थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे या पदासाठी निवडणूक लढविण्यास अनेकजण इच्छूक आहेत. त्यामुळे गावातील सुकाणू समितीला सदस्य पदांची निवडणूक बिनविरोध करण्यास यश मिळण्याची शक्यता असली तरी सरपंचपदाची निवड बिनविरोध करण्यासाठी कस लागणार आहे.
‘तरुण भारत’ चे वृत्त तंतोतंत
ग्रामपंचायत निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याबाबतचे वृत्त दैनिक ‘तरुण भारत’ने वेळोवेळी प्रसिद्ध केले होते. निवडणूक आयोगाने अखेर बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून ‘तरुण भारत’चे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.
निवडणूक जाहीर झालेल्या ग्रा.पं.ची तालुकानिहाय संख्या
तालुका ग्रामपंचायती
आजरा 36
भुदरगड 44
चंदगड 40
गडहिंग्लज 34
गगनबावडा 21
हातकणंगले 39
कागल 26
करवीर 53
पन्हाळा 50
राधानगरी 66
शाहूवाडी 49
शिरोळ 17
एकूण 475