प्रवाशांमधून संताप : वेळ बदलाची माहिती देण्याची मागणी
बेळगाव : कोणतीही पूर्वसूचना न देता रविवारी कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस अचानक रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात आला. दररोज या एक्स्प्रेसने प्रवास करणारे प्रवासी वेळेवर हजर होते. परंतु, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यामुळे पुढील एक्स्प्रेस येईपर्यंत प्रवाशांना वाट पहावी लागली. यापुढील काळात तरी एक्स्प्रेस रद्द करण्यापूर्वी प्रवाशांना पूर्वकल्पना द्यावी, अशी मागणी केली जात आहे. रविवारी मिरज-पंढरपूर व मिरज-हुबळी रेल्वेमार्गांवर दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने काही एक्स्प्रेस रद्द तर काहींच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एक्स्प्रेस रद्द केल्याचे जाहीर करूनदेखील नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने कोणतीही माहिती प्रसिद्ध केली नसल्याने रविवारी कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेसची वाट पहात प्रवासी बसले होते. आयत्यावेळी एक्स्प्रेस रद्द झाल्याची माहिती समजताच प्रवाशांनी संताप व्यक्त पेला.
रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
मिरज-हुबळी एक्स्प्रेस सोमवार दि. 18 रोजी रद्द करण्यात आली आहे. तर यशवंतपूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस मंगळवार दि. 19 रोजी एक तास उशिराने धावणार आहे. दादर-पुदुच्चेरी एक्स्प्रेस मंगळवार दि. 19 रोजी 1 तास 15 मिनिटे उशिराने तर अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस मंगळवारी अर्धा तास उशिराने धावणार आहे. दादर-हुबळी एक्स्प्रेसही 2 तास 30 मिनिटे उशिराने धावणार असल्याने प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकानुसार प्रवास करण्याचे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेने केले आहे.









