ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसद भवनाचे आज पारंपरिक पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. या उद्घाटन सोहळय़ाची सुरुवात पूजेने झाली. PM मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या पूजेला बसले होते. या उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला तामिळनाडूच्या पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये मोदींकडे राजदंड सुपूर्द केला. हे राजदंड हातात घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली.
देशाच्या नवीन संसद भवनामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या शेजारी हा राजदंड स्थापित करण्यात आला आहे. सेंगोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राजदंडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या राजदंडाकडे स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. प्रतीकात्मकदृष्ट्या सत्तेचे हस्तांतर म्हणून ब्रिटिशांनी हा राजदंड पंडित नेहरू यांच्याकडे सोपवला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 14 ऑगस्ट 1947 रोजी हा राजदंड ब्रिटिशांकडून स्वीकारला होता. या सेंगोलकडे प्रतीकात्मकतेने राजवट आणि सत्ता म्हणून पाहिले जायचे.
दरम्यान, या संसद भवनाच्या निर्मितीसाठी 60 हजार कामगारांनी योगदान दिले आहे. संसदेच्या उद्घाटनापूर्वी संसदेच्या बांधकामासाठी योगदान देणारे अभियंते, कामगार यांचे मोदींनी आभार मानले, तसेच त्यांचा सन्मानही केला.
संसद भवनाच्या लोकार्पणानिमित्ताने सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सेन्ट्रल व्हिस्टामध्ये संसद भवन आहे. या उद्घाटन सोहळय़ासाठी भाजपकडून वतीने जय्यत तयारी करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणावेळीही सर्वधर्म समभावाचं दर्शनही घडलं. संसद भवनाच्या हॉलमध्ये सर्व धर्म प्रार्थना सभेत 12 धर्मांच्या प्रतिनीधींनी त्यांच्या धर्मातील पवित्र शब्द म्हटले आणि नव्या संसदेसाठी प्रार्थना केली.









