भारताला आध्यात्मिक साधनेचे सर्वोच्च स्थान का दिलेय हे पहायचे ठरवले तर गंगोत्रीजवळ हे उत्तर सापडते. इथली हिमशिखरे आम्हाला एकाचवेळी मौनातही नेतात अन् शब्दाचे खळाळही उठवतात. शुभ्र धवल गिरीशिखरांना पाहताना वाऱयाच्या झोताची वस्त्र अंगावर झुळझुळत राहतात. पायाला मखमली स्पर्श देताना पाण्याचे स्फटिक डोळय़ासमोर रेखत राहतात. या सगळय़ात एक पवित्र मंगल ओंकार कानात, मनात आदळत राहतो. कशाकशाला वंदन करावं समजतंच नाही. अशावेळेस फक्त शरणागत भाव उमटत जातो. ह्या जगाच्या निर्मात्याल्या श्री विष्णूंनासुद्धा इथे येवून हे सगळेच वैभव बघावेसे वाटले, यातच या स्थानाचे वैभव आले. बद्रीनाथाच्या परिसरात असलेली हिरवी वृक्षराजी म्हणजे देवासाठी अंथरलेली पाचूची बेटं कितीही घ्या दोन्ही हातांनी लूटा, पण संपतच नाही.
कथा गंगेच्या…. गंगेचा हा कोवळा प्रवाह तिच्या बाललिलांची ओळख करून देतो. तिचं कन्यास्वरूप आपल्याला मंत्रमुग्ध करतं. तिच्या या रूपाला भुलून तिच्याशी खेळायला निघालेली अल्लड मैत्रीण म्हणजे देवप्रयागची पहाडातली अलकनंदा अशा काही हातात हात घालून निघतात जणू हरिद्वारचा लक्ष्मण झूला खेळायला निघालेल्या सख्याच. अशा वातावरणात नजर आणि मनसुद्धा भिरभिरत राहतं हे खरं. देवव्रताची आई असलेली गंगा साऱया आर्यावताची आई बनते ती याच तिच्या वात्सल्यमयी स्त्रीरूपामुळे तिचं आखीव रेखीवपण, अल्लडपण, गंभीरपण आणि सोसण्याच्या पलीकडे गेल्यावर धारण केलेले ऊन्मत्त रूप, पुरामुळे केलेला हाहाकार, सगळंच विलक्षण. पुराण महात्म्य… बद्रीनाथ मंदिरचा उल्लेख अनेक पुराणात येतो. विष्णूपुराण, स्कंदपुराण, महाभारत, श्रीमद्भागवत या सगळय़ात या मंदिराचे उल्लेख आढळतात. त्याची नावे अशी……..सत्ययुग…मुक्तीदाता, त्रेतायुग…योगसिद्ध, द्वापारयुग…विशाल बद्री.
कथा…….विष्णूभक्त नारदमुनी सतत नारायणाचा जयघोष करत त्रिखंडात फिरत असले तरी गुरूदर्शनासाठी कधीही विष्णूपुरीत दाखल होत असत. एकदा अशीच लहर आली आणि श्री विष्णूंना वंदन करायला थेट क्षीरसागरात आले. पहुडलेल्या विष्णूंचे पाय लक्ष्मीदेवी दाबून देत होत्या. साक्षात भगवतीला कामाला लावलेले पाहून त्यांच्या चेहऱयावर रागीट भाव उमटले, विष्णूंना त्याचा जाब विचारला, विष्णूंनी त्यांचे समाधान केले पण विष्णूंना बेचैनी आली. उगीचच अपराधी असल्यासारखं वाटलं आणि तात्काळ तपश्चर्येला निघाले. साऱया त्रिखंडात हिंडले पण मनाला शांत वाटेना. शेवटी हिमालयातल्या या भागिरथी गंगेच्या संगमावरच्या शिळेवर विसावले. आसन सिद्ध करून तपाचरण सुरू केलं पण बर्फाच्छादित होवू लागले. इकडे लक्ष्मीदेवीचे हृदय हेलावलं, काय करावं सुचत नव्हतं पण त्याही हिमालयात पोचल्या. श्री विष्णू ध्यानस्थ असल्याने काहीच कळले नाही. लक्ष्मीदेवींनी बोरीच्या झाडाचे रूप घेऊन आपल्या फांद्यानी बर्फ पडू न देण्याची काळजी घेतली. देवाबरोबर तिचीही तपश्चर्या सुरू झाली. इथूनच मनुष्यवंशाला आणि जीवसृष्टीला सुरूवात झाली असे मानतात. त्यांच्या संरक्षणासाठीच देव सपत्नीक तेथेच राहतात, असे मानले जाते. त्याला साथ देणारी लक्ष्मीदेवी पण बरोबर असल्याने विष्णूंना लक्ष्मीके म्हणजेच बद्रीके नाथ असं संबोधलं जातं. बद्री म्हणजे बोरं …असा हा बद्रीनाथ. त्याचं यथार्थ वर्णन महाभारतात व्यासांनी केलंय.








