4500 रुपयांमध्ये मिळते कॉफी
आपल्या अवतीभोवती एकतरी असा व्यक्ती असतो, जो अॅडव्हेंचरस असतो. अशा अॅडव्हेंचरस व्यक्तीसाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे. चीनमध्ये कॉफी पिण्यासाठी लोक स्वत:चा जीव जोखिमीत टाकत असतात. चीनच्या गुइजाउ प्रांतातील लिबो काउंटीत हा अनोखा परंतु भीतीदायक कॅफे आहे.

लिबो काउंटीत द क्लिफ कॅफे असून तो उंच ठिकाणी तयार करण्यात आलाआहे. 200 मीटरच्या उंचीवर हवेत झुलणारा हा कॅफे आहे. येथे कुठल्याही खुर्च्या अन् टेबल नाहीत, तर लाकडी सीट असून ती पर्वताला जोडण्यात आली आहे. येथे पर्यटकांना इन्स्टंट कॉफी पावडर आणि आइस क्युब्ससोबत एक कप कोल्ड कॉफी दिली जाते. पर्यटक येथे हवेत झुलत स्वत:च्या कॉफीचा आनंद घेऊ शकतात, कारण आसपासचे दृश्य अत्यंत सुंदर आहे.
येथे येण्यासाठी संबंधिताचे वजन 100 किलोपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जर संबंधित व्यक्ती दररोज व्यायाम करत नसेल तर तेथे पोहोचणे त्याच्याकरता अवघड ठरणार आहे. या कॅफेपर्यंत पोहोचण्यासाठी 1.6 किलोमीटरचे गिर्यारोहण करावे लागते. त्यानंतरच 70 मजल्यांइतक्या उंचीवर पोहोचता येते. 20 मीटरच्या दोरखंडाचा जिना चढल्यावर लाकडी सीटपर्यंत लोक पोहोचतात. येथे कॉफी पिण्यासाठी लोकांना 4500 रुपये खर्च करावे लागतात. यात पर्यटकांना सेफ्टी गियरचे भाडे, गाइड सेवा, कॉफी आणि विमासुविधेचा खर्च सामील असतो.









