साताऱयातील पाणी पुरवठय़ाचे तीनतेरा नागरिक हैराण ः आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयाचे तापमान 38 ते 40 अंशाच्या दरम्यान झाले असताना घामाच्या धारा लागत आहेत. यातच पाणी टंचाईसारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सातारकर हैराण झाले आहेत. शहराच्या पूर्व भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर पश्चिमेकडे मात्र कासवरुन होणारा पाणी पुरवठा भुयारी गटर योजनेमुळे गढुळ व मातीमिश्रीत होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, नगरपालिकेने पाणी गाळून, उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील पुर्व भाग म्हणून ओळखला जाणारा सदरबझार या भागात गेल्या काही दिवसापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी नसल्याने टँकर बोलवण्यात येत आहेत. या टॅँकरसाठी रांगा पहायला मिळत आहेत. या पाणी टंचाईकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी. अशी मागणी होत आहे. तरीही अद्याप या भागातील परिस्थिती जैसे थे च आहे. याउलट मंगळवार पेठ, रामाचा गोट, चिमणपुरा पेठ, व्यंकटपुरा पेठ, यादोगोपाळ पेठ काही भाग, डोंगरभागातील माची पेठ, तसेच भैरोबा टाकीवरून होणारा पाणीपुरवठा इत्यादी भागात कास माध्यमातील बंदिस्त पाईपलाईनवरून पाणीपुरवठा होतो. परंतु सध्या कासवरून येणारे पाणी गढूळ व मातीमिश्रीत येत असल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. याची माहिती मिळताच हे पाणी उकळून व गाळून पिण्यास वापरण्याचे आवाहन सातारा नगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.
मे महिन्यातील पाणी टंचाई काय ?
एप्रिल महिन्यात पाणी टंचाई सुरू झाली आहे. अजून कडाक्याचा मे महिना सुरू व्हायचा आहे. पारा आणखी वाढल्याने पाणी पातळी खालवणार आहे. यामुळे वारंवार निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या नागरिकांना व प्रशासनाला विचार करायला भाग पाडणार आहे. यामुळे वेळसोबत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर टाळणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, तसेच एक दिवसाआड पाणी पुरवठा असे उपाययोजना आखल्या पाहिजेत.
पालिका गांभीर्याने घेत नाही
भुयारी गटरचे काम सुरू आहे. यामुळे पाण्याच्या पाईप जागोजागी तोडण्यात आलेल्या आहेत. तसेच पालिकेचे कर्मचारी हे कामात हलगर्जीपणा करतात. यामुळे दूषित पाणी पुरवठा होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मी गेल्या दहा बारा दिवसांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यांची माहिती देत आहे. परंतु त्यावर कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत.








