अंबडगट्टी चोरी प्रकरणांचा लावला छडा
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबडगट्टीजवळ आपली वाहने उभी करून झोपलेल्या प्रवाशांच्या खिशातून रोकड व मोबाईल पळविल्याच्या आरोपावरून कित्तूर पोलिसांनी हुबळी येथील दोघा जणांना अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख एम. वेणुगोपाल यांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, कित्तूरचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेटी, उपनिरीक्षक राजू ममदापूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी ही कारवाई केली आहे. सुरेश पंडित बजंत्री (वय 49), बसवराज ऊर्फ रुद्राप्पा हुच्चाप्पा हेब्बळ्ळी (वय 32) दोघेही राहणार हुबळी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्याजवळून चोरीसाठी वापरलेली केए 25 एचएफ 4804 क्रमांकाची एक मोटारसायकल, पाच हजार रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. अंबडगट्टी येथील सतीशअण्णा कल्याण मंटपासमोर विरुपाक्षी रुद्राप्पा नाईक, रा. कोचेरी, ता. हुक्केरी हे आपली ट्रॅक्स उभी करून झोपले होते. 23 मे 2023 रोजी पहाटे त्यांच्या पँटेच्या खिशातील 14 हजार रुपये रोख रक्कम, एक मोबाईल संच पळविण्यात आला होता. त्यानंतर 12 जून रोजी पहाटे याच कल्याण मंटपासमोर सिद्दय्या शिवानंद डंगूर, रा. संगोळ्ळी यांनी आपली क्रूझर उभी करून झोपले असता त्यांच्याही पँटेच्या खिशातून 2500 रुपये रोख रक्कम व एक मोबाईल संच पळविण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात कित्तूर पोलिसांना यश आले आहे.
अफवांना ऊत
या दोन्ही घटना उघडकीस आल्यानंतर अफवांना ऊत आला होता. तलवारीचा धाक दाखवून वाहनचालकांना लुटण्यात आल्याची माहिती सर्वत्र पसरली होती. मात्र, कित्तूर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून हुबळी येथील दोघा जणांना अटक केली असून हे दोघे भुरटे चोर असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.









