पंजाबमध्ये एकास अटक, ‘पाँझी स्कीम’ माध्यमात 49 हजार कोटी रुपयांच्या अपहाराची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्तर प्रदेश राज्याच्या आर्थिक गुन्हे कक्षाने तब्बल 49 हजार कोटीपेक्षा अधिक रुपयांचा ‘पाँझी स्कीम’ घोटाळा उघडकीस आणला आहे. या प्रकरणाची पाळेमुळे देशभरात पसरली असून या संदर्भात पंजाबमधून एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. अन्य सहा जणांचा शोध घेतला जात आहे. गौतम सिंग असे त्याचे नाव असून त्याने आणि त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी ‘पर्ल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड’ या बनावट कंपनीच्या माध्यमातून हा घोटाळा केल्याचे उघड होत आहे.
या कंपनीचा एक संचालक गौतम सिंग याला शुक्रवारी उत्तर प्रदेश आर्थिक गुन्हे कक्षाने पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यातून अटक केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशभरातील 5 कोटीहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, राजस्थान, बिहार आणि केरळ या राज्यांमधील गुंतवणूकदारांचा, फसवणूक झालेल्यांत प्रामुख्याने समावेश आहे.
चार जणांना यापूर्वीच अटक
या प्रकरणात 10 मुख्य आरोपी असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यापैकी चार जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार गौतम सिंग याला शुक्रवारी अटक करण्यात आली असून अन्य पाच जणांना शोधण्यासाठी पथके देशाच्या विविध भागांमध्ये पाठविण्यात आली आहेत.
अनेक प्रकारे फसवणूक
या पाँझी स्कीमच्या माध्यमातून कोट्यावधी गुंतवणूकदारांची विविध मार्गांनी जाळ्यात अडकवून फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. लोकांना भूखंड मिळवून देण्याच्या आमिषाने त्यांच्याकडून लक्षावधी रुपये उकळण्यात आले आहेत. तसेच गुंतवणुकीवर उच्च दराने व्याज देण्याचे आमिषही दाखविण्यात आले आहे. पैसा दामदुप्पट दराने वाढण्याच्या आणि भूखंड मिळण्याच्या हव्यासापोटी देशभरातील कोट्यावधी लोकांनी या स्कीममध्ये पैसा गुंतवून स्वत:ची हानी करुन घेतल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे. या घोटाळ्याचा आकार आता स्पष्ट झाला आहे, त्याच्यापेक्षाही अधिक असू शकतो, असे अनुमान आहे.
घोटाळ्याचे स्वरुप
ज्या कंपनीच्या माध्यमातून हा महाघोटाळा करण्यात आला आहे, ती मूलत: गुरुवंत अॅग्रोटेक कंपनी लिमिटेड या नावाने 1996 मध्ये पंजाबमध्ये नोंद करण्यात आली होती. या कंपनीचे नाव 2011 मध्ये नवे करण्यात आले. त्यानंतर तीच कंपनी ‘पर्ल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड’ या नावाची झाली. तिचे मुख्य कार्यालय दिल्लीत स्थापन करण्यात आले आहे. या कंपनीने भारतातील किमान 10 राज्यांमध्ये शेकडो शाखा उघडल्या. या शाखांच्या माध्यमातून अनेक बनावट भूखंड योजनांची जाहिरात करण्यात येत होती. स्वस्तात भूखंड मिळेल, या मोहापायी अनेकांनी या कंपनीत लक्षावधी रुपयांची गुंतवणूक केली. अनेकांनी त्यांची जीवनभरातील कमाई या फसव्या कंपनीत गुंतविली, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. तसेच दोन वर्षांमध्ये गुंतवलेली रक्कम दुप्पट होईल, असे आश्वासनही देण्यात आले होते. प्रारंभी काही जणांना लाभ मिळाल्यामुळे या योजनांना मोठ्या फ्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर कोट्यावधी लोकांनी पैसे गुंतविले. आता त्यांच्यावर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे.
लोकांनीच शहाणे होण्याची आवश्यकता
अशा असंख्य पाँझी स्कीम्स आजवर येऊन गेल्या आहेत. कोट्यावधी लोकांनी लोभापायी त्यांच्याकडून फसवणूक करून घेतली आहे. तरीही लोक सावध होत नाहीत. आता लोकांनीही अवास्तव पैसा मिळविण्याचा हव्यास सोडून शहाणे होण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.









