सीआयडीकडून कुठ्ठाळी गोदामाची तपासणी : अफलातून उत्तरांतून मिळाली अचंबित माहिती : कारकुनाने फोनवरुन धान्य देण्यास सांगितले
प्रतिनिधी / पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिसांनी सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेपर्यंत छापे मारून जप्त केलेले रेशन धान्य सरकारी गोदामातील नसल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरी पुरवठा खात्याला ‘क्लिन चिट’ दिली आहे. दुसऱया बाजूने सरकार, अधिकारी सारवासारव करण्यासाठी धावपळ करत असले तरी सीआयडीने मात्र कारवाई सुरुच ठेवली आहे. प्ठ्ठाळी, पणजी, बेतोडा येथे सरकारी गोदामांत संबंधीत कागदपत्रांची कसून तपासणी केली असता गोदाम प्रमुखाच्या “कारकुनाने फोनवरुन धान्य देण्यास सांगितले’’ या उत्तराने सारा घोटाळा चव्हाटय़ावर आणला आणि अनेक प्रश्न निर्माण केले.
कुठ्ठाळी येथील सरकारी गोदामात काल गुरुवारी सीआयडीने तपासणी केली. या तपासणीतूनही नागरी पुरवठा खात्याचा घोटाळेबाज कारभार पुन्हा चव्हाटय़ावर आला. तेथील गोदाम प्रमुखाने दिलेल्या माहितीतून खात्याचा कारभार कसा ‘राम भरोसे’ सुरु आहे, याची प्रचिती सीआयडीला आली.
कारकुनाने फोनवरुन धान्य देण्यास सांगितले
सोमवारी रात्री खासगी ट्रकमध्ये भरलेल्या रेशन धान्याच्या साडेचारशे गोण्या जप्त करण्यात आल्या होत्या. तो रेशन धान्याचा साठा कुणाच्या सांगण्यावरून ट्रकमध्ये भरण्यात आला होता? असे सीआयडीने काल गुरुवारी तेथील गोदाम प्रमुखाला विचारले. त्याने दिलेल्या अफलातून उत्तरांतून खात्यातील घोटाळय़ाची व्याप्ती किती असावी, याची कल्पना सहज येते. त्याने पोलिसांना सांगितले की आपल्याला पणजीहून खात्याच्या मुख्यालयातून कारकूनाने फोन केला आणि हे धान्य ट्रकवाल्याकडे देण्यास सांगितले होते, असे सांगितले.
तो कारकून कोण? फोनवरुन आदेश देता येतो काय?
धान्य देण्यास फोनवरुन सांगणाऱया त्या कारकुनाचे नाव गोदाम प्रमुखला विचारल्यास ते नाव तो पोलिसांना सांगू शकला नाही. त्यामुळे पणजीतील तो कारकून कोण? आणि गोदाम प्रमुख त्याचे नाव का लपवतो? आणि असे फोनवरुन शेकडो गोण्या रेशन धान्य दिले जाऊ शकते काय? या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही, यावरुनच खात्यात किती घोटाळा आणि किती घुशी, किती उंदिर असतील याचा अंदाज बांधता येतो.
मुख्यमंत्र्यांच्या ‘क्लिन चिट’बद्धलही आश्चर्य व्यक्त
रेशन धान्याच्या या घोटाळय़ात अनेक कर्मचारी, अधिकारी गुंतलेले असून आता सर्वजण एकमेकांना पाठीशी घालण्याच्या प्रयत्नात मोठी लपवाछपवी करत आहेत. त्यातच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने न पाहता तांदळांचा घोटाळा करणाऱयांनाच ‘धुतल्या तांदळांसारखे’ क्लिन चीट दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
अटकेतील पाचही संशयितांना जामीन
दरम्यान या प्रकरणात सोमवारी अटक करण्यात आलेल्या पाचही संशयितांची जामिनावर सुटका झाली आहे. फरार झालेल्या संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी या रेशन धान्य घोटाळय़ाचा ‘मास्टर माईंड’ सचिन नाईक याच्या अर्जावर आज शुक्रवारी सुनावणी होणार असून विरेंद्र म्हार्दोळकर याच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
फरारी सचिन, विरेंद्रचे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
राज्यात रेशन कार्डवर स्वस्त दरात वितरीत केल्या जाणाऱया धान्याचा काळा बाजार करणाऱया रॅकेटचा सीआयडीने सोमवार-मंगळवारी पर्दाफाश केला. नागझर-कुर्टी फोंडा, कुंडई व आजार्डा बोरी अशा तीन ठिकाणी छापे मारुन 751 तांदळांच्या तर 283 गव्हांच्या गोण्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात तौसीफ मुल्ला, राम कुमार, हजरत अली सय्यद, विनय कुमार गुड्डामणी व प्रकाश कोरीशट्टर याना अटक केली होती, त्यांची काल गुरुवारी जामिनावर सुटका झाली आहे. सचिन नाईक व विरेंद्र म्हर्दोळकर हे फरार असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले आहेत.
सीआयडीने जप्त केलेले रेशन धान्य सरकारी गोदामातील नसल्याचे सांगून नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी हात वर करण्याचा प्रयत्न केला असला तरी या प्रकरणात अनेक अधिकारी गुंतले असल्याची माहिती कुठ्ठाळी गोदामातील चौकशीने चव्हाटय़ावर आली आहे. हा एक महाघोटाळा असून त्यात सचिन नाईक हा ‘मास्टर माईंड’ आहे. त्याला अटक केल्यानंतरच जप्त केलेला रेशन धान्याचा साठा कुठून आणि कसा आला हे उघड होईल, असे सीआडीच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.
सचिन नाईकचा बोरीत गोदाम
बोरी येथे सचिन नाईक याच्या मालकीचा गोदाम असून त्या गोदामातूनही रेशन धान्याचा साठा जप्त केला होता. खाजगी गोदामातून जप्त केलेल्या गोणीवर सरकारी छाप होते.
उत्तर गोव्यात जसा सचिन नाईक हा रेशन धान्याचा माफिया आहे, तसा दक्षिण गोव्यातही एक माफिया असून तो एका माजी मंत्र्याचा नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे हा नातेवाईक कोण याबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
रेशन धान्य प्रकरणात अधिकारी, कर्मचारी नाही ः मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गहू-तांदूळ चोरीप्रकरणी नागरी पुरवठा खात्याला ‘ज्क्लन चीट’ दिली असून खाते वा खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांचा त्या प्रकरणात सहभाग नाही, असा खुलासाही त्यांनी केला आहे. स्वस्त धान्य (रेशन) दुकानात शिल्लक राहिलेला माल चोरी करुन किंवा लपून-छपून विकण्यात आलेला आहे. ती दुकाने शोधण्याचे काम सुरु असून त्यामागे असलेल्या सूत्रधाराला पकडण्यात येईल, असेही डॉ. सावंत यांनी नमूद केले. पोलीस खात्याकडून या प्रकरणी चौकशी सुरु असून सत्य लवकरच उघड होईल, अशी खात्री त्यांनी वर्तवली आहे.









