वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिगर बँकिंग क्षेत्रातील कंपनी एसबीएफसी फायनान्स लिमिटेडचा आयपीओ या आठवड्यात येणार आहे. कंपनी आपल्या आयपीओतून 1025 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. सदरचा आयपीओ 3 ऑगस्टला खुला होणार असून 7 ऑगस्टला बंद होणार असून रिटेल गुंतवणूकदारांना यादरम्यान बोली लावता येणार आहे.
कंपनीचे समभाग मुंबई शेअरबाजार (बीएसई) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यावर 14 ऑगस्टला लिस्ट होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. रिटेल गुंतवणूकदारांना एक लॉट घ्यावा लागणार असून त्यात 260 समभाग असतील. कंपनीने आयपीओची किंमत 54-57 रुपये प्रति समभाग ठेवली आहे. 57 रुपये प्रतिसमभाग याप्रमाणे पाहता 1 लॉटसाठी 14,820 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त 13 लॉटकरीता बोली लावता येणार आहे. कंपनी 600 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी समभाग बाजारात सादर करणार असून प्रवर्तक 425 कोटी रुपयांचे समभाग ऑफर फॉर सेलअंतर्गत विक्री करणार असल्याचे सांगितले जात आहे.
टीव्हीएसची सहकारी कंपनी आणणार आयपीओ
टीव्हीएस समूहातील सहकारी कंपनी टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स यांचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीओ येणार असून त्यांच्या अर्जाला बाजारातील नियामक सेबीने मंजुरी दिली असल्याची माहिती आहे. आयपीओअंतर्गत कंपनी 750 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी समभाग सादर करणार आहे. याशिवाय सध्याचे प्रवर्तक व समभागधारक 2 कोटीहून अधिक इक्विटी समभागांची विक्री ऑफर फॉर सेलअंतर्गत करणार आहेत. एप्रिलमध्ये आयपीओ सादरीकरणासंदर्भात कागदपत्रे सेबीकडे जमा केली. सेबीने अखेर 18 जुलैला आयपीओस मंजुरी दिली.









