पोलीस आयुक्तांची प्रसार माध्यमांना माहिती : सीमाभागात तीव्र संतापाची लाट , मराठी भाषिक जाणीवपूर्वक टार्गेट
बेळगाव : म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या पाठोपाठ आता समिती नेते शुभम शेळके यांनादेखील पोलिसांनी राऊडी शिटर ठरविले आहे. शेळके यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात यापूर्वीच 12 गुन्हे दाखल झाले असल्याने राऊडी शिट उघडण्यात आली आहे. सोशल मीडियावर प्रक्षोभक प्रतिक्रिया दिल्याने शेळके यांना सोमवारी अटक करण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. संघटनेशी बांधिल राहून काम करणाऱ्या समिती कार्यकर्त्यांना पोलिसांकडून राऊडी शिटर ठरविले जात असल्याने सीमाभागात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा, या मागणीसाठी म. ए. समितीच्यावतीने गेल्या 69 वर्षांपासून सीमाभागातील मराठी बांधव केंद्र आणि राज्य सरकारबरोबर झगडत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने, लढे दिले जात आहेत. लोकशाहीच्या माध्यमातून लढे देण्यात येत असले तरी पोलिसांकडून म. ए. समिती नेते आणि कार्यकर्त्यांवर सुरुवातीपासूनच खोटे-नाटे गुन्हे दाखल केले जात आहेत. सातत्याने वेगवेगळ्या गुन्ह्यांत मराठी माणसांना गोवले जात असल्याने याचा परिणाम सीमालढ्यावर होत आहे. सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या अधिक असतानाही बेळगाववर कर्नाटक सरकार आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी कानडी वरवंटा फिरविला जात आहे.
दुकानांच्या नामफलकांवर 60 टक्के कन्नड भाषेतील फलक असणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचबरोबर काळ्यादिनाची मूक सायकल फेरी आणि महामेळावा घेण्यासाठीदेखील परवानगी नाकारली जात आहे. लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र सीमाभागात कर्नाटक सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. त्यामुळे अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या म. ए. समिती नेते आणि कार्यकर्त्यांना सातत्याने पोलीस खाते गुन्ह्यांमध्ये गोवण्याचे काम करत आहे. कोणत्याही प्रकारच्या सराईत गुन्हेगारीत सहभाग नसतानाही केवळ मराठी भाषा, संस्कृती आणि संघटनेसाठी काम करत असताना युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांना पोलिसांनी यापूर्वीच राऊडी शिटर यादीत घातले आहे.
त्यामुळे त्यांना सातत्याने काळ्यायादीतील गुन्हेगारांसमवेत पोलीस ठाण्यात बोलाविले जाते. त्यानंतर आता समितीचे युवा नेते शेळके यांनादेखील पोलिसांनी राऊडी शिटर ठरविले आहे. प्रक्षोभक प्रतिक्रिया व्यक्त केल्याचा ठपका ठेऊन शुभम शेळके यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सोमवारी सायंकाळी त्यांना मिरज येथून अटक करण्यात आली. घाईघाईने कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. केवळ संघटनेशी बांधिल राहून कार्य करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांना पोलीस जाणीवपूर्वक टार्गेट करत असल्याने सीमाभागात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
जामीन अर्जावर आज सुनावणी
शुभम शेळके यांना माळमारुती पोलिसांनी सोमवारी अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या न्यायालयात होणार आहे. त्यामुळे शेळके यांना जामीन मिळावा यासाठी अॅड. महेश बिर्जे यांनी मंगळवारी पोलीस उपायुक्तांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.









