मुख्यमंत्री फडणवीसांकडून सावंतवाडीकरांना अपेक्षा
न्हावेली/ वार्ताहर
२०२४ मध्ये राज्यात सत्तेवर आलेल्या युती सरकारचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ जून २०१५ रोजी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झाले होते.मात्र गेल्या नऊ वर्षात टर्मिनस कामाची साधी विटही रचली गेली नाही. केवळ भूमिपूजन करणाऱ्यांच्या नावांची कोनशीला अद्यापही उभी आहे. सुदैवाने देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसबाबत जिल्हावासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नऊ वर्षांपूर्वी प्रारंभ केलेले हे काम आता पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.
दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,२७ जून २०१५ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झाले. या कोनशिलेला येत्या जून महिन्यात दहा वर्षे पूर्ण होतील. भूमिपूजनानंतरही सुमारे चार वर्षात रेल्वे टर्मिनसचे काम सुरुच झाले नाही. सन २०१९ मध्ये राज्यात माविआ सरकार सत्तेवर आल्याने देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर सुमारे अडीच वर्षानी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. आता २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.त्यामुळे सावंतवाडी टर्मिनस भूमिपूजन विषयाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. भूमिपूजनानंतर सुरुच न झालेले हे काम मुख्यमंत्री म्हणून फडणवीस या टर्ममध्ये पूर्ण करणार का ? असा सवाल रेल्वे प्रवासी संघटना व तालुकावासीयांमधून व्यक्त होत आहे.गेली नऊ वर्षे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस भूमिपूजनाची कोनशिला धूळखात उभी आहे.प्रत्यक्ष कामच सुरू न झाल्याने राज्य शासनाकडून सिंधुदुर्ग वासीयांची फसवणूक झाल्याची भावना जनतेत आहे.आता नऊ वर्षानी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने सावंतवाडीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या त्या कार्यकाळात रखडलेले हे टर्मिनस फडणवीस यांनी आपल्या या टर्ममध्ये पूर्णत्वास न्यावे अशी जनतेची अपेक्षा आहे.









