सावंतवाडी –
सावंतवाडी नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांनी थकीत मानधन व अन्य मागण्यांसाठी 15 सप्टेंबर सकाळी आठ वाजल्यापासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेतला . गुरुकुल मध्ये कंत्राटी सफाई कामगारांची बैठक आज सकाळी अकरा वाजता संपन्न झाली. ही बैठक माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, अभय पंडित, मनोज घाटकर, अफरोज राजगुरू, बंड्या तोरसेकर, उमेश खटावकर, सुंदर गावडे, जॉनी फर्नांडिस, कामगार प्रतिनिधी बाबू बरागडे, सागर खोरागडे, विनोद काष्टे, रवी जाधव, विजय कदम, शोहेब शेख, धोंडी अनावकर, बाबू कदम, मिलिंद तांबे, सचिन कदम, तुकाराम नेरुळकर, आदी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेच्या कारभाराचा पाढा वाचला. प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या दालनामध्ये बैठक होऊन सुमारे पंधरा दिवस लोटले तरी तांत्रिक कारणे पुढे करत नगरपरिषद अधिकाऱ्यांना पगार देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे न्याय हक्कासाठी 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून पासून कामगारांनी बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला. थकीत पीएफ बाबतही कोणतीही अद्याप कार्यवाही केली नसल्यामुळे न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









