माडखोल येथे मोय कुंभयासह सावरीचे झाड कोसळले
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी – बेळगाव या आंतरराज्य महामार्ग दरम्यान माडखोल साबळे स्टॉप नजीक मोय कुंभयासह सावरीचे झाड कोसळल्याने या आंतरराज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहकार्याने तात्काळ ही तिन्ही झाडे हटवून पाऊण तासात हा आंतरराज्य महामार्ग वाहतुकीस खुला केला.
जिवन केसरकर यांच्या घरानजिक सापळे स्टॉप येथील महामार्ग लगतची तिन्ही झाडे सायंकाळी तीनच्या सुमारास भर महामार्गावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी क्षणाचाही विचार न करता जीवन केसरकर, विलास म्हापसेकर, गणपत घाडी, सोबीन मॅथ्यू, दत्ताराम केसरकर, भूषण घाडी यांनी तात्काळ कटरच्या सहाय्याने ही झाडे कापण्यास सुरुवात केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने पाठवलेल्या जेसीबीच्या सहाय्याने महामार्गावरील ही झाडे दूर करण्यात आली. पाऊतासानंतर हा महामार्ग वाहतुकीस खुला झाला. स्थानिकांच्या या तत्परतेबाबत वाहन चालकांसह प्रवाशांनी त्यांचे कौतुक केले.









