वार्ताहर / कुदनूर
येथील श्री सिद्धेश्वर सॉ- मिल, ऑईल मिल आणि फॅब्रिकेशन कारखान्याला आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीत अद्ययावत मशिनरीसह दोन बकर्या जळून खाक झाल्या असून, सुमारे एक कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, दुर्घटनेचे कारण अद्याप निरुत्तरीत आहे. शासनाकडून सुतार कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणीही घटनास्थळी व्यक्त केली जात होती.
याबाबतची अधिक माहिती अशी, कुदनूर-कालकुंद्री मार्गावर शशिकांत शिवराम सुतार आणि बंधू यांचे राहत्या घराच्या बाजुला श्री सिद्धेश्वर सॉ-मिल, ऑईल मिल आणि फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. लाकूड कापण्याचे अरायंत्र तसेच तेल गिरणी असल्याने तेथे मोठ्याप्रमाणात टाकाऊ माल यामध्ये लाकूड, लाकडाचा भुसा, शेंगबियांची टलफरे तसेच तेल आदींचा मोठा साठा होता. वर्षारंभाच्या दिवशीच रविवारी पहाटे चारच्या सुमारास सदर कारखान्यातून आगीच्या ज्वाला निघत असल्याचे काही स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ सुतार कुटुंबियांना याची कल्पना दिली. सुतार कुटुंबिय घटनास्थळी धाव घेताच एकच आक्रोश सुरू केला. याचबरोबर घटनेची माहिती मिळताच काही स्थानिक आणि तरुण मदतकार्यास सरसावले. आग विझविण्यासाठी अनेकजण शर्तीचे प्रयत्न करत होते. मात्र, तेथील फेब्रिकेशन कारखान्यात गॅस सिलिंडर असल्याचे लक्षात आल्याने गॅसचा स्फोट होईल या भीतीमुळे सावध झाले. हे करत असतानाच अग्निशामक दलाशी संपर्क साधला गेला. गडहिंग्लज नगरपरिषदेकडून अग्रिशामक बंब पाठविण्यात आला. मात्र, बंब सात वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचला. तत्पूर्वी सर्व आगीत जळून खाक झाले होते. घटनेची बातमी वार्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी तसेच सुतार कुटुंबियांचे सांत्वन करणार्यांची संख्याही अधिक होती. घटनेचा पंचनामा करण्यासाठी कोवाडचे मंडळ अधिकारी, कुदनूरचे तलाठी, चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, पोलीसपाटील, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
आयुष्याची कमाई क्षणार्धात जळून खाक
सुतार कुटुंबियांचा चाळीसहून अधिक वर्षापासून सॉ-मिलचा व्यवसाय सुरु आहे. या व्यवसायातून प्रगती करत त्यांनी ऑईल मिल त्यापाठोपाठ फेब्रिकेशन आदी व्यवसायही मोठ्या कष्ठाने सुरु केले होते. मात्र, रविवारी पहाटेचे चित्र डोळ्यासमोर पाहताच संपूर्ण सुतार कुटुंबाने एकच हंबरडा फोडला. आगीने बघता-बघता रौद्ररुप धारण केल्याने सुतार कुटुंबाने मिळविलेली आयुष्याची संपूर्ण कमाई क्षणार्धात आगीत जळून खाक झाली. हे सर्व पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत होते.
गणेशमुर्ती, मशिनरीसह निष्पाप बकरी दगावली
आगीचे रौद्ररुप इतके भयंकर होते की, अर्ध्या तासात तिन्ही व्यवसाय आगीच्या भक्षस्थानी गेले. यामधील अद्यायावत मशिनरी, मोटरी, दुचाकी, विद्युत मीटर, लाकुड साठा, तेल साठा, फॅब्रिकेशनचे साहित्य आदीसह काही गणेशमुर्ती जळून खाक झाल्या. याशिवाय ऑईल मिलमध्ये पाच-सहा बकरी बांधण्यात आली होती. त्यातील तीन बकरी वाचविण्यात आली. मात्र, दोन निष्पाप बकरी आगीत होरपळून दगावली.
घातपाताचीच चर्चा…
सुतार बंधूंच्या तिन्ही कारखान्यात सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत आहे. या यंत्रणेद्वारे पाहिले असता चारच्या सुमारास आग लागल्याचे समजते. याशिवाय त्याच दरम्यान काही अज्ञातांचा वावरही कॅमेर्यात कैद झाला आहे. त्यामुळे घातपाताच्या हेतूनेच ही घटना घडल्याची चर्चाही घटनास्थळी होत होती. पोलीस यंत्रणेने या घटनेचा सखोल तपास करण्याबरोबर सुतार कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे.