पुणे / प्रतिनिधी :
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पीएचडी. प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राने प्रसिद्ध केले. मात्र, विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाकडून स्थानिक विद्यार्थ्यांसाठी पेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पीएचडी. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना पेट परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
आंतरराष्ट्रीय केंद्राकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा आणि मुलाखत हे दोन टप्पे पूर्ण करून प्रवेश दिला जाईल. इच्छुक विद्यार्थ्यांना 20 सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल, तर 30 सप्टेंबरला ऑनलाइन परीक्षा होईल. मात्र, त्याचवेळी पीएचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी उत्सुक स्थानिक विद्यार्थ्यांसाठी पेट परीक्षा कधी होणार हा प्रश्न आहे. विद्यापीठ प्रशासनाने केवळ पीएचडीसाठी रिक्त जागांची माहिती मार्गदर्शकांकडे मागवली होती. मात्र, ही माहिती मार्गदर्शकांनी सादर न केल्याने सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.
अधिक वाचा : चिनी धोरणांच्या विश्लेषणकर्त्या तज्ज्ञांची भारतात कमतरता, माजी परराष्ट्र सचिव श्याम सरण यांची खंत
पेट परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाने जुलैमध्ये दिली होती. आता सप्टेंबर सुरू झाला तरी विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे विद्यापीठाला पेटच्या आयोजनाचा विसर पडला का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.