पुणे / प्रतिनिधी :
क्यूस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग (QS World University Ranking) मध्ये देशात IIT Mumbai पहिल्या क्रमांकावर आले असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) रँकिंगमध्ये मोठी घसरण झाली आहे. मागील वर्षी विद्यापीठाचे रँकिंग 541 ते 550 दरम्यान होते. यंदा मात्र विद्यापीठाचा रँक 200 ने कमी झाला आहे. त्यामुळे टाईम्स रँकिंगमध्येes (Times Ranking) दिलासा मिळाल्यानंतर क्यूएस रँकिंगमध्ये विद्यापीठाला झटका बसला आहे.
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 जाहीर झाली असून, अमेरिकेतील ‘एमआयटी’ संस्था अव्वल ठरली आहे. तर केंब्रिज विद्यापीठ दुसऱ्या, ऑक्सफर्ड विद्यापीठ तिसऱ्या, हार्वर्ड विद्यापीठ चौथ्या आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ पाचव्या आणि लंडनचे इंपिरियल कॉलेज सहाव्या स्थानावर आहे.
भारतातील 45 विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळाले आहे. यावेळी पहिल्या 200 मध्ये दोन, 300 मध्ये सहा आणि 500 च्या यादीत 11 विद्यापीठे आहेत. यामध्ये आयआयटी आणि इतर केंद्रीय शैक्षणिक संस्थांचाच समावेश आहे. दिल्ली विद्यापीठ आणि अण्णा विद्यापीठाने प्रथमच जगातील पहिल्या 500 च्या यादीत स्थान मिळवले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात 16 व्या क्रमांकावर असून 711 ते 720 रँकिंग आहे. तर मुंबई विद्यापीठाला 751 ते 760 रँकिंग मिळाले आहे. टाईम्स रँकिंगप्रमाणेच पुणे विद्यापीठ महाराष्ट्रात आयआयटी मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, मागील वर्षी क्यूएस रँकिंगमध्ये विद्यापीठ 541-550 दरम्यान होते.
आयआयटी बॉम्बे, गुवाहाटी, दिल्ली विद्यापीठ, जेएनयू, आयआयटी भुवनेश्वर, पंजाब विद्यापीठ, थापर इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी, व्हीआयटी यांनी त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. तर आयआयएसी बंगलोर, आयआयटी दिल्ली, खरगपूर, कानपूर, मद्रास, इंदूर, हैदराबाद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ, ओपी जिंदाल, जामिया मिलिया इस्लामिया यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.








