उपमहापौरपदी आनंद चव्हाण यांची निवड, सत्ताधारी गटाची बाजी : नगरसेवकांचा जल्लोष
बेळगाव : महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक गुऊवारी पार पडली. यामध्ये भाजपच्या सविता जयपाल कांबळे यांनी बाजी मारली असून त्यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर आनंद चव्हाण यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. महापौर-उपमहापौरपदी भाजपच्याच नगरसेवकांची निवड झाल्याने भाजपच्या नगरसेवकांनी मोठा जल्लोष केला. बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक गुरूवार दि. 15 रोजी पार पडली. या निवडणुकीसाठी मनपा आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचीच सत्ता असल्यामुळे भाजपचाच महापौर-उपमहापौर होणार हे निश्चित होते. महापौरपदासाठी अनुसुचित महिला आरक्षण जाहीर झाले होते. सत्ताधारी गटामध्ये दोन महिला नगरसेविका यासाठी पात्र होत्या. तर विरोधी गटाकडे अनुसुचित महिला नसल्यामुळे अर्ज दाखल करण्यात आला नाही. तर सत्ताधारी गटातील दोन्ही नगरसेविका महापौरपदासाठी इच्छूक होत्या. त्यामुळे सत्ताधारी गटासमोर पेच निर्माण झाला. मात्र तातडीने बैठक घेऊन सविता जयपाल कांबळे यांची निवड करण्याचे ठरविण्यात आले.
महापौरपदासाठी सविता कांबळे यांना पाठिंबा
महापौरपदासाठी सविता कांबळे यांचेच नाव आघाडीवर होते. मात्र लक्ष्मी राठोड यांनी देखील हट्ट धरला होता. दोन्ही महिला इच्छुक असल्यामुळे माजी मंत्री मुरगेश निराणी, माजी आमदार अनिल बेनके यांनी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. त्यामध्ये सविता काब्ंाळे यांनाच पाठिंबा मिळाला. माजी आमदार अनिल बेनके यांनीही सविता कांबळे यांनाच पाठिंबा दर्शविला. त्यामुळे अखेर त्यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित झाले. त्यानुसार त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला.
उपमहापौरपदासाठी आनंद चव्हाण यांना पाठिंबा
उपमहापौरपद हे दक्षिण भागासाठी देण्यात आले होते. सर्वसामान्य आरक्षण असल्यामुळे उपमहापौरपदासाठीही मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आनंद चव्हाण यांना पाठिंबा दर्शविल्यामुळे त्यांची उपमहापौरपदी निवड झाली. त्यांनी 39 मते घेऊन विजय संपादन केला. उपमहापौरपदी शिक्कामोर्तब झाल्यानंतर सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी एकच जल्लोष केला. गुरूवारी सकाळी 9 वाजता मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सकाळी 11 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अवधी देण्यात आला होता. महापौरपदासाठी 4 अर्ज दाखल केले. सविता कांबळे यांनी दोन तर लक्ष्मी राठोड यांनी दोन अर्ज दाखल केले. चारही अर्ज वैध ठरल्याचे निवडणूक अधिकारी आणि प्रादेशिक आयुक्त एस. बी. शट्ट्याण्णावर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आपले अर्ज मागे घेण्यासाठी 2 मिनीटांचा अवधी देण्यात आला. त्यामध्ये लक्ष्मी राठोड यांनी आपली दोन्ही अर्ज मागे घेतल्याने सविता कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
आनंद चव्हाण यांना 39 मते
उपमहापौरपदासाठी एकूण 6 अर्ज दाखल झाले. आनंद चव्हाण यांनी 2, माधवी राघोचे 2, विरोधी गटातर्फे ज्योती कडोलकर यांनी 1, शामुबीन सलीमखान पठाण यांनी 1 अर्ज दाखल केला, असे एकूण 6 अर्ज दाखल झाले होते. हे सर्व अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी वैध ठरल्याचे सभागृहात सांगितले. त्यानंतर माघार घेण्यासाठी 2 मिनीटांचा अवधी देण्यात आला. त्यामध्ये माधवी राघोचे यांनी दोन्ही अर्ज तर शामुबीन पठाण यांनी देखील आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे ज्योती कडोलकर आणि आनंद चव्हाण यांचे अर्ज राहिल्याने मतदान घेण्याचे जाहीर केले. मतदारांनी हात उंचावून आपली मते नोंदविण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार आनंद चव्हाण यांना 39 तर ज्योती कडोलकर यांना 20 मते मिळाली. त्यामध्ये आनंद चव्हाण हे विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले. या विजयानंतर सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
चुकीचा अर्ज दिल्याने उडाला गोंधळ
उमेदवार ज्योती कडोलकर यांच्या समर्थनात काढण्यात आलेले अर्जावरच सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे गोंधळ उडाला. त्यांच्या समर्थनात नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात मतदान केले आहे. असे असताना त्यांच्या समर्थनासाठी काढण्यात आलेला अर्जावर आमची स्वाक्षरी घेतला आहात, असे सत्ताधारी गटाच्या नगरसेवकाने सांगितले. त्यानंतर तातडीने त्या अर्जामध्ये बदल करण्यात आला. चुकीने हा प्रकार घडल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. या निवडणुकीवेळी आयुक्त राजेश्री जैनापुरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक असल्यामुळे महानगरपालिकेच्या आवाराध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगरसेवक आणि पत्रकार वगळता इतर कोणालाही आत प्रवेश देण्यात आला नाही. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी देखील परिसरात भेट देऊन पाहणी केली.
काँग्रेसचे आमदार अनुपस्थित
या निवडणुकीमध्ये भाजपचे पारडे जड होते. त्यामुळे भाजपचा महापौर-उपमहापौर होणार हे निश्चित होते. त्यामुळे काँग्रेसचे सर्वच आमदार अनुपस्थित होते. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ हे तिघेही अनुपस्थित होते. याचबरोबर विधान परिषद सदस्य साबन्ना तळवार हे देखील अनुपस्थित होते. केवळ भाजपच्या खासदार मंगला अंगडी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.









