कोल्हापूर / धीरज बरगे :
केंद्र सरकारने डिएपी खतांना विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे 8 कोटी 77 लाख 39 हजार 200 रुपयांचा फायदा होणार आहे. जिल्ह्यात खरीप व रग्बी अशा दोन्ही हंगामात मिळून शेतकऱ्यांकडून 18 हजार 279 मे.टन खतांचा वापर केला जातो. त्यानुसार साधारणत: 3 लाख 65 हजार 580 इतक्या गोण्यांची विक्री दोन्ही हंगामात होते. विशेष सवलत योजनेतून प्रति गोणी 240 रुपये इतके अनुदान मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या नववर्षातील प्रथम बैठकीत डाय–अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खतांना विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डीएपी खतांना सध्या असलेल्या अनुदानासह अतिरिक्त विशेष अनुदान मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 3850 कोटींचा निधी घोषित केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष सवलत योजनेमुळे खतांचे दर स्थिर
जिल्ह्यात खरीप व रग्बी हंगामात शेतपिकांसाठी शेतकऱ्यांकडून डीएपी व मिश्र खतांचा मोठयाप्रमाणात वापर केला जातो. यापैकी डीएपी खतांना केंद्र सरकारकडून सुमारे सातशे रुपये अनुदान दिले जाते. सध्या दिल्या जाणाऱ्या अनुदानानुसार डिएपी खताच्या एका गोणीची किंमत 1350 रुपये इतकी आहे. या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय खत कंपन्यांनी घेतला होता. त्यानुसार 50 किलोच्या एका गोणीची किंमत 1590 रुपये इतकी होणार होती. मात्र सरकारने डीएपी खतांना विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोणीचा दर 1350 रुपये असा स्थिर राहणार आहे. विशेष अनुदानमुळे प्रतिगोणी 240 रुपयांची बचत होणार आहे.
डिसेंबर महिन्यात 5067 मे.टन खत विक्री
जिल्ह्यात 1 डिसेंबर 2024 अखेर 5946 मे.टन इतका डिएपी खतसाठा शिल्लक होता. 31 डिसेंबर 2024 पर्यंत 2530 मे.टन खत पुरवठा करण्यात आला. त्यानुसार 8477 मे.टन इतका खतसाठा शिल्लक होता. त्यापैकी 5067 मे. टन खतविक्री डिसेंबर महिन्यात झाली आहे. तर डिसेंबर अखेर 3409 मे.टन इतके डीएपी खत शिल्लक आहे.
जिल्ह्यात खतांचा होणारा वापर
खतांचा प्रकार खतांचा वापर (आकडेवारी मे.टनमध्ये)
खरीप रग्बी एकूण
12:32:16 884 500 1384
10:26:26 14311 10826 25137
डीएपी 14166 4113 18279
डिसेंबर 2024 अखेर जिल्ह्यातील शिल्लक खतसाठा
ग्रेड एकूण शिल्लक खतसाठा (मे.टनमध्ये)
युरिया 16143.252
डीएपी 3409.615
एमओपी 4254.879
संयुक्त खते 16074.121
एसएसपी 6813.45
कंपोस्ट 3.4
एफओएम 58.69
एकूण 46757.407








