नशेबाज तरुण-तरुणींना आवर घालण्याची मागणी : जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांना मोर्चाद्वारे निवेदन
बेळगाव : नानावाडी रोडवरील सावगाव गावच्या शेतवडीत अनेक बेकायदा प्रकार सुरू आहेत. त्याचबरोबर गावापासून काही अंतरावर असलेल्या धरण परिसरातदेखील नशेबाज तरुणांचा वावर वाढला आहे. त्यामुळे याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करण्याची वेळ आली असून, पोलिसांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. परिणामी महिलांना शेताकडे जाणे कठीण बनले असून, गावच्या परिसरात बाहेरुन येणाऱ्या तरुण-तरुणींचा व नशेबाज तरुणांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी सावगाव ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
गेल्या काही वर्षापासून नानावाडी रोडवरील सावगाव गावच्या हद्दीतील शेतवडीत तरुण-तरुणींचा वावर वाढला आहे. निर्जनस्थळ शोधून त्याठिकाणी अश्लिल चाळे केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेताकडे जाणे कठीण झाले आहे. दारू, गांजा त्याचबरोबर इतर अमलीपदार्थ सेवन करून नशेबाज तरुण-तरुणींचे हिडीस कृत्य सुरू असते. दिवसा तसेच रात्री अपरात्री बेकायदा प्रकार सुरू असल्याने त्याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करण्याची वेळ आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी त्याचबरोबर प्रेमीयुगूल नको ते कृत्य करत आहेत.
उलट शेतकऱ्यांवरच आरोप करण्याचे प्रकार
संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. शेतात अश्लिल चाळे करणाऱ्यांना शेतकरी हटकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र उलट शेतकऱ्यांवरच नको ते आरोप केले जात आहेत. शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल केले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नानावाडी रोडवरील बेकायदा प्रकारांना आळा घालण्यात यावा. तसेच गावापासून काही अंतरावर असलेल्या निसर्गरम्य धरण परिसरातदेखील मद्यपींचा वावर वाढला आहे. जागा मिळेल त्या ठिकाणी पार्ट्या करण्यासह मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला जात आहे. दारुच्या बाटल्या फोडल्या जात आहेत.
कारवाई करण्याची मागणी
सध्या काजू-आंब्यांचा हंगाम सुरू झाल्याने शेतकरी महिला शेताकडे जात आहेत. पण नशेबाज तरुणांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने महिलांना शेताकडे जाताना विचार करण्याची वेळ आली आहे. अनेक दिवसांपासून हे प्रकार सुरू असले तरी पोलिसांनी अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळे या गंभीर प्रकरणाकडे लक्ष घालून तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी बेनकनहळ्ळी ग्रा. पं. चे अध्यक्ष डॉ. वाय. एम. पाटील, सदस्य कल्लाप्पा प. पाटील, कल्लाप्पा म. पाटील, लक्ष्मी सुतार, माजी ग्रा. पं. अध्यक्ष निंगाप्पा मोरे, संतोष पाटील, सागर सांगावकर, मारुती काकतकर, नारायण कडलीकर, अशोक पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









