बेळगाव :
शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अथणी, सौंदत्ती, रामदुर्ग, बैलहोंगलसह अनेक तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. कृष्णेच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. रामदुर्ग तालुक्यातील गोडची येथे पावसामुळे मरकटनाळला जाणारा रस्ता जलमय झाला आहे. चंदरगीला जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी वाढले आहे. गोडचीजवळ ओढ्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराला स्थानिक नागरिकांनी दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले आहे. अथणी-मसरगुप्पी दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. बैलहोंगल तालुक्यातही अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आला आहे. होसूर-मुरगोड व बैलहोंगल-मुनवळ्ळी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. रामदुर्ग तालुक्यातील मागनूर-मल्लापूर रोडवरील वाहतुकीवरही पावसामुळे परिणाम झाला आहे.









