तालुक्यातील आई-वडिलांचा आर्त टाहो : गृहमंत्र्यांनी लक्ष घालून गांजा, मटका, जुगारांवर आळा घालण्याची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यात गांजा, मटका यासह जुगार, सट्टाबाजार यासारख्या व्यसनात युवापिढी गुंतली असल्याने युवा पिढीचे अस्तित्व उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे हतबल आई, वडिलांनी आता गृहमंत्र्यांनीच आपल्या मुलांना वाचवण्याचा आर्त टाहो फोडून मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर क्रम घ्यावा, अशा विनवणी होत आहे. तालुक्यात गेल्या दहा वर्षापासून गांजासह अंमली पदार्थांच्या व्यसनाला सुरुवात झाली. यात पहिल्यांदा तरुण मुले व्यसनाधीन झाली होती. मात्र हे लोण हळूहळू महाविद्यालयातून माध्यमिक शाळेपर्यंत पोहोचले. आज तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळेतील विद्यार्थी या गांजाच्या आहारी गेल्यामुळे अनेक पालकांसमोर यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. माध्यमिक दशेतच ही मुले गांजाच्या इतक्या आहारी गेलेत की आपण काय करतोय याचेही भान या मुलांना नाही. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी हे दारू आणि गांजा या दोन्ही व्यसनाच्या आहारी गेल्याने तरुण पिढीच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अनेक अपघात, तंटे, मारामारी व्यसनाची तलप भागविण्यासाठी छोट्या मोठ्या चोऱ्याही होत आहेत. त्यामुळे युवकांचे भविष्यच अंधकारमय बनले आहे. मुलांचे आई, बाप हतबल झालेले आहेत. या व्यसनात अनेकांनी आपले जीवही गमावलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील युवक या व्यसनातून बाहेर येणे गरजेचे आहे.
मटका, गांजाविक्री विरोधात पोलिसांकडून जुजबी कारवाई
याबाबत पोलिसांकडून कोणतीच कठोर कारवाई होताना दिसत नाही. खानापूर तालुक्यात मटका, गांजाविक्री राजरोसपणे सुरू आहे. या विरोधात पोलिसांकडून जुजबी कारवाई केल्याचे दाखवण्यात येते. मात्र ज्याच्यावर कारवाई होते तो अवघ्या आठ दिवसातच जामिनावर सुटून येतो. गांजा विक्रेत्यांचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहे. व्यसन करणाऱ्यांपर्यंत गांजा योग्य पद्धतीने पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळे ही युवापिढीच या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे अनेक पालक हतबल झाले आहेत. व्यसनाची तलप आली की तलप भागविण्यासाठी ही व्यसनाधीन मुले कोणतेही पाऊल उचलत आहेत. त्यामुळे अनेक वाईट प्रकार शहरासह तालुक्यात घडताना दिसत आहेत. यात गेल्या दहा वर्षात अनेक तरुण मुलांचा हकनाक जीव गेलेला आहे. त्यांचे आई, बाप अक्षरश: हताश होऊन काहीच करू शकत नाहीत. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने गृहमंत्री बेळगावातच आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनाच साद घालून पोलीस खात्याला योग्य सूचना कराव्यात, अशी तळमळीची मागणी या पालकांकडून होत आहे.
मटकाही राजरोसपणे
तालुक्यात मटका, जुगार आणि सट्टाबाजारही मोठ्या प्रमाणात सुरू असून यात राजकीय नेत्यांचे हस्तकच मटका आणि जुगारात गुंतलेले आहेत. त्यांच्या माध्यमातूनच खानापूर तालुक्यात मटका राजरोसपणे सुरू आहे. मटका मोबाईलवरून घेण्यात येतो आणि काही वेळेला ते वर पाठवले जातात. अन्यथा हेच लोक मटक्याचे पैसे आपल्याकडेच ठेवून गब्बर झालेले आहेत. यात अनेक कुटुंबे आणि मटका खेळून कर्जबाजारी होऊन उद्ध्वस्त झालेले आहेत. मात्र मटका घेऊन डब मारणारे गब्बर झालेले आहेत. अशी चर्चा शहरासह तालुक्यात होत आहे. ठरावीक लोकांच्या माध्यमातूनच हा मटका घेण्यात येतो. मटका जिंकण्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याने मटका घेणारेच गब्बर होताना दिसत आहेत. याबाबत पोलिसांनी योग्य भूमिका घेतल्यास मटका घेणारे आणि खेळणाऱ्यांवर निश्चित चाप बसणार आहे. यासाठी पोलिसांनी तालुक्यातील मटका, जुगार आणि व्यसनाधीनतेवर कठोर उपाययोजना करण्यासाठी क्रम हाती घेणे गरजेचे आहे. अन्यथा खानापूर तालुक्यात युवापिढीचे भविष्य अंधकारमय होणार आहे.









