सुळेभावी येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नाझिया खान यांचे प्रतिपादन
वार्ताहर/सांबरा
वक्फ बोर्ड म्हणजे लँड माफिया असून वक्फ बोर्डला देशातून हद्दपार केले पाहिजे कारण वक्फ बोर्डचा कुराणमध्ये किंवा संविधानमध्ये साधा उल्लेखही नाही. त्यासाठी केंद्र सरकारने वक्फ बोर्ड रद्द करून देश वाचविला पाहिजे असे प्रतिपादन भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नाझिया खान यांनी केले. त्या रविवार दि. 19 रोजी सुळेभावी येथे आयोजित हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रमुख वक्त्या या नात्याने बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, सध्या देशाला गजवा ए हिंदचा धोका वाढला आहे. इस्लामच्या नावावर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले. 1989 ते 1991 मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांचा नर संहार झाला. यासह देशांमध्ये अनेक हल्ले झाले. हे सगळे इस्लामच्या नावाखाली झाले. वास्तविक पाहता इस्लामची शिकवण ही वेगळी आहे. केवळ दिशाभूल करून इस्लामच्या नावाखाली कुटिल कारस्थाने केली जात आहेत. कुराणमधील आयातांचा संदर्भ देत सध्या चाललेल्या कारस्थानचा त्यांनी पर्दाफाश केला. हिंदू जर संघटित झाला नाही तर आपल्या भारत देशाला बांगलादेश होण्यास वेळ लागणार नाही, यासह अनेक मुद्दे त्यांनी मांडले.
जातीचा भेदभाव न करता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे
जितेंद्रनाथ सरस्वती म्हणाले की, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक हल्ले परतावून लावले होते. मात्र आज आपला स्वराज्य धोक्यात आला आहे. हिंदू जाती-जातीमध्ये विखुरला असल्याने हिंदू धर्म धोक्यात आला आहे. यासाठी जातीचा भेदभाव न करता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी संबोधित केले. व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोपालजी भट, धनंजय जाधव, पंडित ओगले, जयदीप देसाईसह अनेक मान्यवर उपस्थित होते.









