पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांची गोमंतकीयांना हाक : माशेल युनियन ऑफ जर्नालिस्टतर्फे क्रांतीदिनी व्याख्यान
वार्ताहर /माशेल
म्हादई बचावाची अंतिम लढाई सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे सुशेगाद गोमंतकीयांनी निर्धास्त राहू नये. जनजागृतीसाठी चळवळीच्या माध्यमातून ही धग कायम ठेवावी. अन्यथा भविष्यात गोमंतकीयांची परिस्थिती ‘समुद्री चोहीकडे पाणी, पिण्याला थेंब नाही’ अशी होणार असल्याचे भाकित पर्यावरण प्रेमी राजेंद्र केरकर यांनी केली. माशेल युनियन ऑफ जर्नालिस्ट संघटनेतर्फे क्रांतिदिनानिमित्त लोटस सभागृहात आयोजित केलेल्या ‘म्हादई परम सत्य’ या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना काढले. यावेळी त्याच्यासमवेत ज्येष्ठ पत्रकार राजू भिकारो नाईक, ज्येष्ठ पत्रकार संजय घुंग्रेटकर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतान ते म्हणाले की म्हादईचे अस्तित्व राखून ठेवण्यासाठी जंगल सुरक्षित ठेवा. म्हादई अभयारण्यातील मनुष्य वस्ती विरहीत जे क्षेत्र आहे ते 100 चौ किलोमिटर सर्वात आधी वाघ्र क्षेत्र म्हणून आरक्षित करा, तेव्हाच म्हादई अस्तित्व अबाधित राहणार असे कटू सत्य त्यानी यावेळी मांडले. म्हादई बचाव अभियान घरोघरी पोचविणे अंत्यत गरजेचे आहे. म्हादईचा प्रवाह गोव्यासाठी मिळाल्यास विहीरींचे व झऱ्याचे पाणी पिण्यायोग्य शाबूत राहणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या क्षेत्रातील वाळवंटी नदीची झालेली गटारगंगा प्रथम सुधारावी, आजच्या राजकारण्यांना ‘नदी’ म्हणजे काय याचा अभ्यास सर्वात आधी करावा. ज्या वकिलांनी म्हादईचे खोरे कधी बघितलेच नाही ते म्हादईचा विषय न्यायायलात कसे सक्षमपणे मांडणार असा प्रश्न उपस्थित करून सरकारला जाग आणली आहे.
नद्या राष्ट्रीय संपत्ती… पाण्याचा प्रवाह विरूद्ध दिशेने वळविणे निसर्गाशी वैरत्व
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजू भिकारो नाईक म्हणाले की नद्यावर कुणा व्यक्तीची, राज्याची मालकी नसते. ती राष्ट्रीय संपत्ती असते. राष्ट्राची संपत्ती असली तरीही तिचा वापर राष्ट्रांना स्वत:च्या मनमानीपणे करता येत नाही हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. म्हणूनच निर्सगातील प्रत्येक घटकाच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी जागतिक पातळीवर काम करणारी व्यासपीठे, संघटना, परिषदा, करार होत आहेत. त्यात कर्नाटकासारखे राज्य स्वत:च्या पाण्याची गरज भासविण्यासाठी म्हादईचे पाणी विरूद्ध दिशेने वळवून निसर्गाशी वैरत्व पत्करून छोट्याशा गोव्याचा गळा घोटू पाहत आहे. शंभर वर्षाहून अधिक वर्षाचा जुना कर्नाटक व तामिळनाडूमधील कावेरी जलतंटा ज्याप्रमाणे माजी पंतप्रधान स्वगीर्य अटलजी वाजपेयी यांनी सोडविला त्याप्रमाणे ईच्छाशक्ती हवीय तेव्हाच म्हादईचे पाणी गोव्याला मिळणार असे राजू नाईक म्हणाले.
जिवनदायिनी म्हादईसाठी सर्वानी झटावे-संजय घुंग्रेटकर
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार संजर घुग्रेटकर म्हणाले की म्हादई परम सत्य आज म्हादईच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हादई जगली तर आम्ही जगणार आहोत,तिचे रक्षण झाले, संवर्धन झाले तरच आपली जीवन सुरळीत चालणार आहे. अन्यत: पाणी टंचाईबरोबरच इतर अनेक समस्या निर्माण होणार आहेत. कर्नाटकाने पुर्ण क्षमतेने पाणी वळवले तरी भयानक स्थिती निर्माण होणार आहे. ती होऊ नये यासाठी प्रत्येकाने लढले पाहिजे जिवनदायिनी म्हादईच्या संवर्धनासाठी सर्वानी झटले पाहिजे असे आवाहन घुग्रेटकर यांनी केले. कार्यक्रमाचे पर्यावरणपूरक पद्धतीने मान्यवरांच्याहस्ते रोपट्याला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. स्वागत संघटनेचे अध्यक्ष नारायण नाईक यांनी केले. व प्रास्ताविक संघटनेचे सल्लागार प्रेमानंद शिरोडकर यांनी केले. संघटनेचे संस्थापक मनोजकुमार घाडी यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सदस्य दिनेश नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.









