समग्र सावरकर आख्यानात संदीप बुवा माणके यांचे प्रतिपादन

फोंडा : हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्या विभूतीनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यामध्ये वीर सावरकरांच्या समर्पित जीवनाचा उल्लेख अनिवार्य आहे. स्वत:च्या घरादारावर तुलसीपत्र ठेवून देशाच्या रक्षणासाठी दिर्घकाळ तुरुंगवास आणि परकीय सत्तेच्या दहशतीखाली आपल्या आयुष्याचा बहुतांश काळ खर्ची घातलेले विनायक दामोदर सावरकर हे सच्चे राष्ट्रभक्त होते. भारतमातेवर निस्सिम प्रेम आणि मनोमन श्रद्धा ठेवून त्यांनी देशाचा आणि पर्यायाने हिंदुत्वाचा खऱ्या अर्थाने पुरस्कार केला. परिणामी आज स्वातंत्र्याची गोड फळे आपण चाखतो त्याचे श्रेय कृतज्ञतापूर्वक अशा देशभक्तांना देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार संदीप बुवा माणके यांनी केले. नववर्ष स्वागत समिती फोंडा आणि सम्राट क्लब फोंडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या समग्र सावरकर या विषयावरील तीन दिवशीय आख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. फोंडा येथील क्रांती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात त्यांनी वीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर उजेड पाडला.
ते म्हणाले, वि. दा. सावरकर हे तत्वज्ञ, विचारवंत, कवी, लेखक, राष्ट्राभिमानी, सत्याग्रही, राजकारणी म्हणून इतिहासात अमर झाले. परंतू संसारसुखाला ते अंतरले. ब्रिटीश राजवटीविरुद्ध त्यांनी संघर्ष केला. अन्न, पाणी आणि औषधांचा त्याग करून त्यांनी मोठ्या आनंदाने मृत्यूला कवटाळले. ते म्हणाले, तुरुंगवासाच्या काळात देशरक्षणासाठी प्राण त्यागण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी शिक्षा देणाऱ्या ब्रिटीशांना सुनावले. त्यामुळे त्यांना शिक्षेच्या नावाखाली छळणारे अधिकारीही खजिल झाले. वि. दा. सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्य यज्ञात समिधा बनून आपली आहुती दिल्याचे संदीपबुवा म्हणाले. सावकरांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात फोंडा सम्राटचे अध्यक्ष जयंत मिरिंगकर आणि नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष साळू भगत यांनी विशेष परिश्रम घेतले. बुवांना ऑर्गनवर प्रदीप शिलकर यांनी तर तबल्यावर रुद्राक्ष वझे यांनी साथसंगत केली.









