आंतरराष्ट्रीय नियकालीकात 14 शोधनिबंध, 4 पेटेंट प्रसिद्ध : सौरउर्जेचा वापर करून पाण्यापासून हायड्रोजन निर्मिती : प्लंबिंग काम करत घेतले उच्च शिक्षण
आप्पासाहेब रेपे/सावर्डे बुद्रुक
तुटपुंजी कोरडवाहू व डोंगराळ शेती त्यातून केवळ लहरी पावसाच्या पाण्यावर येणाऱया पिकावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. वडीलांचे लहानपणीच छत्र हरवले होते. तरीही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्लंबिंग करत सावर्डे बुद्रुक ता. कागल येथील धनाजी मालवेकर या तरुणाने उच्च शिक्षण घेतले आणि दक्षिण कोरिया येथील चोन्नम नॅशनल विद्यापीठात त्याची संशोधक म्हणून निवड झाली आहे. येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात शिक्षण घेणाऱया डॉ. धनाजी यांची कहाणी प्रेरणादायी आहे.
अडाणी आईवडील, गावात घर बांधायलाही जागा नाही. म्हणून सावर्डे बुद्रुकच्या उत्तरेला डोंगराच्या पायथ्याशी शेतातच झोपडीवजा घर बांधले. धनाजी पहिलीत असतानाच त्याच्या वडीलांचे कँन्सरने निधन झाले. परिस्थिती आणखी बिकट झाली. धनाजी मामाच्या गावी चौंडाळ येथे शिक्षणासाठी गेला. आई मिळेल तो रोजगार करून कुटुंबाचा गाडा कसाबसा हाकू लागली. धनाजीने प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर चौंडाळ आणि माध्यमिक शिक्षण महालक्ष्मी हायस्कूल सावर्डे बुद्रुक येथे पूर्ण केले आहे. दूधसाखर महाविद्यालय बिद्री येथे पदवीचे शिक्षण घेत असताना प्लंबिंग व मिळेल तो रोजगार करुन त्याने शिवाजी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर कोल्हापूरात खाजगी क्लासेस सुरु केले आणि त्यातून मिळणाऱया पैशातून डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी, अभिमत विद्यापिठामध्ये धनाजीने पीएच. डी. केली. हे करत असताना त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये 14 शोधनिबंध, 4 पेटेंट प्रसिद्ध केले.

डॉ. मालवेकर यांनी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामधून पदार्थविज्ञान या विषयामध्ये रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. प्राप्त केली आहे. या फेलोशिपमुळे डॉ. मालवेकर यांना सौरउर्जेचा वापर करून पाण्यापासून हायड्रोजन निर्मिती या क्षेत्रात सखोल संशोधन करण्याची संधी मिळाली आहे. हायड्रोजन वायूचा चारचाकी गाडय़ांचे इंधन म्हणून वापर करता येतो. त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या किमतीत वाढ आणि जगातील प्रदूषणाची परिस्थिती पाहता जगातील अनेक नामांकित संशोधन संस्था ग्रीन हायड्रोजन तयार करण्यामध्ये सहभाग घेत आहेत. यामुळे अनेक संशोधकांना यामध्ये संशोधन करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यामध्ये डॉ. मालवेकर यांचा समावेश आहे.
संशोधक विद्यार्थ्यांसाठी जागतिक व्यासपीठ
या निवडीबाबात बोलताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे म्हणाले, अत्याधुनिक संशोधनास चालना देण्याचे, संशोधक विद्यार्थ्यांसाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस विद्यापीठाने ठेवला आहे.









