धर्मेंद्र जडेजा सामनावीर तर पार्थ भूटचे सात बळी
प्रतिनिधी/ सोलापूर
येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअममध्ये झालेल्या रणजी सामन्यात तिसऱ्या दिवशी सौराष्ट्राने महाराष्ट्रावर 48 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सौराष्ट्रचा धर्मेंद्र जडेजा सामनावीर ठरला. सामन्यातील दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा दुसऱ्या डावातील खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्र संघाला विजयासाठी पाच गड्यांच्या मोबदल्यात 104 धावांची गरज होती. तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात तरणजीतसिंग डील्लन आणि सिद्धार्थ म्हात्रे यांनी सावध सुरुवात करत सुरुवातीची 45 मिनिटे सावध खेळ करत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. या दोघांनी मिळून सहाव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. संघाची धावसंख्या 140 असताना सिद्धार्थ म्हात्रे 44 व्या षटकात बाद झाला. सिद्धार्थने 27 धावांचे योगदान दिले. त्यापाठोपाठ तरणजितसिंग 28 धावांवर बाद झाला. यानंतर पार्थ भूटने महाराष्ट्र संघाला आठवा झटका देताना धनराज शिंदेला शून्य धावावर तंबूत परत पाठवले व सौराष्ट्र संघाला विजयाजवळ नेऊन ठेवले. महाराष्ट्र संघाचा कर्णधार केदार जाधव याने 18 धावा केल्या तर इतर ळाचे फलंदाज अपयशी ठरले. 50 व्या षटकात पुन्हा एकदा पार्थ भूट वरचढ ठरला. त्याने महाराष्ट्र संघाचा फिरकीपटू हितेश वाळुंज (1 धावा) याला हार्दिक देसाईकडे झेल देण्यास भाग पाडले. 9 बाद 153 धावा अशी महाराष्ट्र संघाची अवस्था झाली होती. शेवटची विकेट असल्याने केदार जाधवने जलदगतीने धावा जमविण्याच्या उद्देशाने फटकेबाजी करायला सुरुवात केली, मात्र, 52 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात केदार जाधवने विकेट गमावली. या विकेट बरोबरच महाराष्ट्र संघाचा डाव 51.4 षटकांत 164 धावांवर गुंडाळला. सौराष्ट्र संघाने महाराष्ट्र संघावर 48 धावांनी मात करत हा सामना खिशात घातला. सौराष्ट्र संघाकडून फिरकीपटू पार्थ भूट याने विजयात मोलाचा वाटा उचलताना महाराष्ट्राच्या सात फलंदाजांना तंबूत पाठवले. त्याला युवराजसिंग दोडीया दोन बळी तर धर्मेंद्र जडेजाने एक बळी मिळवत उत्तम साथ दिली.
संक्षिप्त धावफलक : सौराष्ट्र प. डाव सर्वबाद 202 व दु. डाव सर्वबाद 164,महाराष्ट्र प. डाव सर्वबाद 159 व दु. डाव 51.4 षटकांत सर्वबाद 164. (सिद्धार्थ म्हात्रे 27 धावा, अंकित बावणे 25 धावा, तरणजीतसिंग डील्लन 28 धावा, विशांत मोरे 21 धावा, पार्थ भुट सर्वाधिक 7 बळी).









