वृत्तसंस्था/ कोलकाता
इडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या 2022-23 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाने आपली वाटचाल जेतेपदाच्या दिशेने केली आहे. सौराष्ट्रने बंगालवर पहिल्या डावात 230 धावांची आघाडी घेतल्यानंतर बंगालने खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 4 बाद 169 धावा जमवल्या. बंगालचा संघ अद्याप 61 धावांनी पिछाडीवर आहे.
या अंतिम सामन्यात बंगालने पहिल्या डावात 174 धावा जमवल्या. त्यानंतर सौराष्ट्रने 5 बाद 317 या धावसंख्येवरून शनिवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांनी 110 षटकात 404 धावापर्यंत मजल मारली. सौराष्ट्रच्या पहिल्या डावात कर्णधार वासवदा, चिराग जानी जॅक्सन आणि हार्विक देसाई यांची शानदार अर्धशतके झळकवली. वासवदा आणि जानी यांनी सहाव्या गड्यासाठी 114 धावांची भागीदारी केली. वासवदाने 11 चौकारासह 81 तर जानीने 10 चौकारासह 60 धावा जमवल्या. पी. मंकडने 6 चौकारासह 33 तर शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला धर्मेंद्रसिंग जडेजाने 5 चौकारासह 29 धावा जमवल्या. बंगालतर्फे मुकेशकुमारने 4 तर आकाशदीप व इशान पोरल यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

230 धावांनी पिछाडीवर असलेल्या बंगालच्या दुसऱ्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे पहिले तीन फलंदाज केवळ 47 धावात तंबूत परतले. त्यानंतर कर्णधार मनोज तिवारी व मुजुमदार यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 99 धावांची भागीदारी केली. खेळ संपण्यास काही मिनिटे बाकी असताना मुजुमदार झेलबाद झाला. त्याने 8 चौकारासह 61 धावा जमवल्या. कर्णधार तिवारी 9 चौकारासह 57 तर शाहबाज अहमद 2 चौकारासह 13 धावावर खेळत आहे. ईश्वरनने 16 तर घरमीने 14 धावा जमवल्या. सौराष्ट्रतर्फे उनादकट आणि साकारिया यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : बंगाल प. डाव 174, सौराष्ट्र प. डाव 110 षटकात सर्वबाद 404 (वासवदा 81, जानी 60, जॅक्सन 59, देसाई 50, मंकड 33, धर्मेंद्रसिंग जडेजा 29, विश्वराज जडेजा 25, मुकेशकुमार 4-111, आकाशदीप 3-111, पोरल 3-86). बंगाल दु. डाव 53 षटकात 4 बाद 169 (मुजुमदार 61, तिवारी खेळत आहे 57, उनादकट 2-47, साकारिया 2-50).









