वृत्तसंस्था / कार्लो (आयर्लंड)
येथे झालेल्या 2025 च्या आंतरराष्ट्रीय बिलीयर्डस-स्नूकर फेडरेशनच्या (आयबीएसएफ) विश्व बिलीयर्डस स्पर्धेचे जेतेपद भारताच्या सौरभ कोठारीने जिंकले. या स्पर्धेतील अंतिम लढतीत कोठारीने आपल्याच देशाच्या अव्वल आणि यापूर्वी अनेकवेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या पंकज अडवाणीचा पराभव केला. सौरभ कोठारीचे हे पहिले विश्वविजेतेपद आहे.
पंकज अडवाणी आणि सौरभ कोठारी हे भारताचे जागतिक स्तरावरील दोन अव्वल बिलीयर्डसपटू म्हणून ओळखले जातात. 40 वर्षीय कोठारीने पंकज अडवाणीचा 725-480 गुणांनी पराभव केला. या सामन्यात कोठारीने 325 गुणांचा ब्रेक नोंदविला. या अंतिम लढतीत कोठारीने 119 आणि 112 गुणांचे शतकी ब्रेक्स नोंदविले. आयबीएसएफची ही निर्धारीत कालावधीतील पहिली विश्व बिलीयर्डस स्पर्धा आयोजित केली होती. सौरभ कोठारीचे वडील मनोज कोठारी यांनी 1990 साली म्हणजेच 35 वर्षांपूर्वी बेंगळूरमध्ये झालेल्या विश्वचषक बिलीयर्डस् स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. 39 वर्षीय पंकज अडवाणीने आयर्लंडमधील झालेल्या स्पर्धेतील अंतिम लढतीत 129, 116, 112 अशा गुणांचे शतकी ब्रेक्स नोंदविले. ही अंतिम लढत तीन तासांच्या कालावधीमध्ये निश्चित केली होती. या लढतीच्या सुरुवातीला अडवाणीने कोठारीवर 50 गुणांची आघाडी घेतली होती. पण त्यानंतर कोठारीने अचूक खेळाचे दर्शन घडवित पंकज अडवाणीवर 200 गुणांची भक्कम आघाडी मिळविली. या स्पर्धेमध्ये भारताचा ध्रुव सीतवाला आणि इंग्लंडचा डेव्हीड कॉसेर हे कांस्य पदकाचे संयुक्त मानकरी ठरले. विश्व बिलीयर्डस स्पर्धेच्या इतिहासामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सिंगापूरचा माजी विश्वविजेता पीटर गिलख्रिस्ट, रॉब हॉल, डेव्हीड कॉसेर, पीटर शिहेन यांनी आपले वर्चस्व राखले होते. सौरभ कोठारी आयबीएसएफ आणि डब्ल्युबीएलचे विश्व बिलीयर्डस जेतेपद मिळविणारा तिसरा भारतीय बिलीयर्डपटू आहे.









