मंत्री एच. के. पाटील यांची माहिती : जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद
प्रतिनिधी/ बेळगाव
सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात मूलभूत सुविधा व विकासासाठी 215 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. दि. 15 सप्टेंबरपर्यंत मंदिराच्या सर्व कामांचे आदेश जारी केले जातील. तसेच जुलै 2025 ते डिसेंबर 2026 पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री एच. के. पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले, सरकारने यल्लम्मा देवी मंदिराचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याबाबत निविदा मागविण्याची व कामांचे आदेश देण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबरअखेर पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची अंमलबजावणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून याला मान्यताही देण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालीच सर्व कामे हाती घेतली जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यल्लम्मा देवी मंदिराच्या डोंगरावर अतिथीगृह, वसतीगृह बांधण्यासाठी अनेक देणगीदार पुढे येत आहेत. आवश्यक ती जमीन दिली जाईल. पण बांधकाम करताना करार करून सरकारकडूनच त्यांना डिझाईन दिले जाईल. 26 ऑगस्ट रोजी देणगीदारांची बैठक बोलावून करार करण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.
215 कोटी रुपयांच्या खर्चापैकी केंद्र सरकारच्या एसएएससीआय योजनेंतर्गत 100 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. तर 97 कोटी मंदिर विकास मंडळ, तसेच 18 कोटी इतर खर्चातून देण्यात येणार आहेत. अशाप्रकारे 215 कोटी रुपयांतून लवकरच मंदिर विकासाचे काम सुरू करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. सीईओ राहुल शिंदे आदी उपस्थित होते.









