बंदच्या अफवेमुळे भाविकांमध्ये संभ्रम
वार्ताहर/बाळेकुंद्री
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिराच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे मंदिर बंद ठेवणार अशी अफवा पसरविण्यात आली आहे. ती निव्वळ खोटी आहे. यल्लम्मा मंदिर बंद ठेवण्यात येणार नाही. अफवेमुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तरी मंदिर नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे, अशी माहिती यल्लम्मा मंदिर प्राधिकरणाचे कार्यदर्शी अशोक दुरगुंडी यांनी ‘तऊण भारत’शी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, काही भाविक सोशल मीडियाद्वारे मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचे मेसेज पाठवत आहेत. याबाबत भाविक आमच्याशी विचारणा करत आहेत. डोंगरावर विकासकामे सुरू असल्यामुळे दोन-तीन वर्षे मंदिर बंद राहणार का?, तसेच देवीच्या दर्शनासाठी संधी आहे की नाही? अशी विचारणा अनेक भाविक फोनद्वारे रोज करत आहेत. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, रोज सकाळी देवीची पूजा करून रात्रीपर्यंत भाविकांना यल्लम्मा मंदिरात दर्शन सुरू असल्याचे सांगितले.
जानेवारीच्या 13 तारखेला शाकंभरी पौर्णिमेनिमित्त देवीची यात्रा यशस्वीरित्या पार पडली आहे. आता 12 फेब्रुवारीला माघी पौर्णिमा असून या काळात आठ ते दहा लाखाहून अधिक भाविक डोंगरावर उपस्थित राहणार असल्याचे सांगून भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिर बंदची माहिती सोशल मीडियावर कोणीही पाठवू नये व मंदिर व्यवस्थापनाला सहकार्य करण्याचे भाविकांना आवाहन केले आहे.









