चार घरफोड्यातील 8 लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : दोघा अट्टल घरफोड्यांना अटक करून आठ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सौंदत्ती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या जोडगोळीने चार घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. संजू दुंडाप्पा बोळेतिन, मंजुनाथ शेखप्पा होंगल, दोघेही राहणार हिरेकोप्प, ता. सौंदत्ती अशी त्यांची नावे आहेत. बुधवार दि. 5 मार्च रोजी या जोडगोळीला अटक करून 6 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोने, 1 लाख 35 हजार किमतीची चांदी, 5 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 8 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मुनवळ्ळी, ता. सौंदत्ती येथील शांतव्वा शिवानंद शिरन्नावर यांचे फार्महाऊस फोडण्यात आले होते.
23 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता. बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तिजोरीतील 20 हजार रुपये रोकड पळविली होती. यासंबंधी सौंदत्ती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक डी. एस. धर्मट्टी, उपनिरीक्षक कलमेश बन्नूर, उपनिरीक्षक एल. आर. गौडी, उदाप्पा पुजेरी, अमर सारापुरे, महेश माळल्ली, उमेश गाणगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संजू व मंजुनाथ या दोघा जणांना अटक केली आहे. सौंदत्ती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील तीन व बैलहोंगल पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एक अशा एकूण चार घरफोड्या प्रकरणातील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.









