ज्यूंसाठी मंकी अन् पिग्स सारख्या शब्दांचा वापर रोखला
वृत्तसंस्था/ रियाध
सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यात बॅकडोअर डिप्लोमसी यशस्वी होताना दिसून येतेय. सौदी अरेबियातील शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात आता इस्रायल किंवा ज्यूविरोधी मजकूर नसणार आहे. सौदीचे युवराज अन् पंतप्रधान बिन सलमान यांच्या आदेशावर हा बदल करण्यात आला आहे.
युवराज सलमान यांनी देशातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातून कट्टरवादी सामग्री हटविण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी सुधारणा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते. सुमारे दोन वर्षांपासून सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमातून इस्रायल तसेच ज्यूविरोधी सामग्री हटविली जात होती. ज्यूंना या पुस्तकांमध्ये मंकी आणि पिग्स संबोधिण्यात आले होते. याचबरोबर ज्यू महिलांविषयी देखील आक्षेपार्ह गोष्टी नमूद होत्या. परंतु आता ही लेखी सामग्री हटविण्यात आली आहे.
या पुस्तकांमध्ये इस्रायलला कट रचणारा देश ठरविण्यात आले होते. इस्रायल सैन्यशक्ती आणि तंत्रज्ञानाच्या बळावर इजिप्तच्या नाईल नदीपासून इराकपर्यंत कब्जा करू इच्छित असल्याचे या पुस्तकांमध्ये म्हटले गेले होते.
दहशतवादी संघटनांना समर्थन बंद
युवराज सलमान यांनी पाच वर्षांपूर्वीच देशात प्रत्येक स्तरावर सुधारणांचा अजेंडा तयार करविला होता. या अजेंड्यावर अंमलबजावणीची जबाबदारी त्यांनी अधिकाऱ्यांना सोपविली होती. कट्टरवादी आणि दहशतवादी मानसिकता असणाऱ्या हिजबुल्लाह, हुती आणि मुस्लीम बद्ररहुडसारख्या संघटनांना समर्थन करणे त्यांनी बंद केले हेते. याऐवजी शांतता प्रस्थापित करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले होते. सौदी युवराजांनी द्वेष, कट्टरवाद आणि दहशतवादी विचारसरणी असणाऱ्या सर्व पुस्तकांवर बंदी घातली आहे. सौदी अरेबियाच्या शिक्षण मंत्रालयाने द्वेष निर्माण करणारी शैक्षणिक सामग्री अभ्यासक्रमातून हटविली आहे. पॅलेस्टाईनचे समथंन अन् इस्रायलला विरोध करणारी एक कविता अभ्यासक्रमातून याचवर्षी हटविण्यात आली आहे. काही पुस्तकांमध्ये जगाच्या नकाशात इस्रायलचे अस्तित्व दाखविण्यात आले नव्हते. आता नकाशात इस्रायलचे अस्तित्व दाखविण्यात आले आहे. तसेच इस्रायल अन् इस्लाम यांच्यात संघर्ष असल्याचा मजकूर अभ्यासक्रमातून हटविण्यात आला आहे.









