वृत्तसंस्था/ हांगझाऊ
सौदी अरेबियाने आपली सर्वोत्तम कामगिरी केलेली नसतानाही हांगझाऊ येथे झालेल्या आशियाई खेळांतील पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात सौदी अरेबियाने 2-0 असा विजय मिळवत भारताचे आव्हान रोखण्यात यश मिळविले. आघाडीपटू मोहम्मद खलील मारानने 51 व्या आणि 57 व्या मिनिटाला दोन गोल करत सौदी अरेबियाचे वर्चस्व दाखवले आणि या स्पर्धेतील भारताच्या मोहिमेचा शेवट केला.
तथापि, प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांचे खेळाडू निश्चित आपल्या कामगिरीविषयी अभिमान बाळगू शकतात. कारण अनिश्चितता असतानाही आणि आघाडीच्या खेळाडूंना मोकळे करण्यास नकार देणाऱ्या इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आयोजकांच्या हट्टीपणामुळे ‘एआयएफएफ’ला दुय्यम बाजू पाठववी लागूनही त्यांनी चांगली कामगिरी केली. सौदी अरेबियाविऊद्ध भारताने विजय मिळविल्यास तो एक चमत्कारच ठरला असता. कारण स्पर्धेपूर्वी हे खेळाडू एका शिबिरातही एकत्र आले नव्हते. हे लक्षात घेता, सुवर्णपदकाचा संभाव्य दावेदार मानल्या जाणाऱ्या सौदीला त्यांनी पहिली 45 मिनिटे गोलशून्य बरोबरीत राखले. हा निश्चितच त्यांच्याकडून प्रशंसनीय प्रयत्न होता.
संदेश झिंगनच्या नेतृत्वाखालील बचावफळीने आपल्या परीने सौदीला रोखण्याचे प्रयत्न केले. परंतु सौदी खेळाडूंचा अधिक चांगला स्टॅमिना, मजबूत पाय आणि तुलनेने उत्कृष्ट कौशल्य यांचे पारडे शेवटी भारी राहिले. चीनच्या सामन्यादरम्यान घडल्याप्रमाणे येथेही 50 व्या मिनिटाला चाके उलटी फिरू लागली. त्या सामन्याच्या तुलनेत यावेळी फरक एवढाच होता की, खेळाडूंना चांगली विश्रांती मिळाली होती आणि त्यामुळे विजेत्यांनी दोन गोल नोंदविल्यानंतरही गोलांचा पाऊस पडला नाही. या गोलमुळे भारतीय संघाची घडी थोडीशी विस्कटली आणि त्यानंतर लगेच दुसरा गोल झाला. असे असले, तरी सौदीला गोल नोंदविण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत.