सूदानमध्ये गृहयुद्धाची स्थिती ः अमेरिकेने स्वतःच्या राजनयिकांना केले एअरलिफ्ट
वृत्तसंस्था/ खार्तूम
आफ्रिकेतील देश सूदानमध्ये लढाईदरम्यान बचावमोहीम सुरू आहे. सौदी अरेबियाने शनिवारी रात्री उशिरा सूदानमध्ये अडकून पडलेल्या 158 लोकांना सुरक्षित बाहेर काढले असून यात अनेक भारतीयांचा समावेश आहे. तर रविवारी सकाळी अमेरिकेने खार्तूममधील स्वतःच्या दूतावासाच्या कर्मचाऱयांना सुरक्षितपणे देशाबाहेर हलविले आहे.
दुतावासातील 70 राजनकि आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सैन्यविमानाचा वापर करण्यात आला. सूदानमध्ये सत्तापालटासाठी सैन्य आणि निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यात संघर्ष सुरू आहे. सूदानमधील स्थिती 15 एप्रिलपासून सातत्याने बिघडत चालली आहे. यामुळे बचाव मोहिमेत अनेक अडचणी उभ्या राहत आहेत.
अमेरिकेचा दूतावास बंद
अमेरिकेने सूदानमधील स्वतःचा दूतावास सध्या बंद केला आहे. दूतावासातील सर्व कामे रोखण्यात आली आहेत. सूदानमध्ये अमेरिकेचा दूतावास पुन्हा कधी सुरु होणार यासंबंधी कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. तर जागतिक आरोग्य संघटनेनुसार 15 एप्रिलपर्यंतच्या संघर्षात 400 जणांना जीव गमवावा लागला होता आणि सुमारे 3500 लोक जखमी झाले होते.
जयशंकर यांची सौदी विदेशमंत्र्यांशी चर्चा
भारतीयांच्या सुरक्षित वापसीवरून विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी 18 एप्रिल रोजी सौदी अरेबियाचे विदेशमंत्री फैसल बिन फरहाद अल सौद यांच्याशी चर्चा केली होती. भारतीयांसोबत 12 मित्रदेशांचे नागरिक सूदानमधून सुखरुप स्वरुपात बाहेर पडल्याचे सौदी अरेबियाच्या विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. सूदानमध्ये सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या लोकांमध्ये राजनयिक आणि आंतरराष्ट्रीय अधिकारी सामील आहेत. तसेच सौदी अरेबियाचे 91 नागरिकही मायदेशी परतले आहेत.
16 एप्रिलला भारतीयाचा मृत्यू
16 एप्रिल रोजी भारतीय नागरिक अल्बर्ट ऑगस्टीन यांचा सूदानमधील संघर्षात मृत्यू झाला होता. अल्बर्ट हे सूदानमध्ये डल ग्रूप कंपनीसाठी काम करत होते. भारत सरकारने सूदानमध्ये राहत असलेल्या स्वतःच्या नागरिकांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. तर भारत सरकारने उच्चस्तरीय बैठक घेत भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी योजना आखण्यास सुरुवात केली आहे. संघर्षाचे केंद्र ठरलेल्या खार्तूममध्ये भारताचे सुमारे दीड हजार नागरिक अडकून पडले आहेत.









